ठुमरी-दादरा-बंदिश गायन स्पर्धा... एक युवा संगीत संमेलन ..
ठुमरी-दादरा-बंदिश गायन स्पर्धा... एक युवा संगीत संमेलन ..

पनवेल / दि.११ ( वार्ताहर ) : लोकांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताची आवड निर्माण व्हावी, तसेच उभरत्या व गुणी कलाकारांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने गेली 26 वर्षे पनवेल कल्चरल असोसिएशन या संस्थेतर्ङ्गे हिंदुस्थानी शास्त्रीय ख्याल गायन स्पर्धा आयोजित केली जात आहे. पण आता बर्‍याच ठिकाणी ख्याल गायन स्पर्धा आयोजित केल्या जातात, मात्र ठुमरी-दादरा हा उपशास्त्रीय गायन प्रकार संगीत स्पर्धा जगतात काहीसा उपेक्षितच राहिला आहे हे लक्षात घेऊन आणि एकूणच तोचतोपणा टाळण्याच्या हेतूने यावर्षी संस्थेने स्पर्धेचे स्वरुप थोडे बदलले. यात इच्छुक स्पर्धकांनी ठुमरी अथवा दादरा यापैकी एक आणि बंदिश आणि नाट्यगीत यापैकी एक असे एकूण 15 मिनिटांचे सादरीकरण व्हिडीओ क्लिपिंगच्या माध्यमातून इ-मेलवर पाठविण्याचे आवाहन संस्थेने केले होते. 
                   स्पर्धेचे हे नवे रुप स्पर्धकांना आवडले आणि केवळ महाराष्ट्रच नाही तर बेळगाव, गोवा येथील स्पर्धकही या स्पर्धेत सहभागी झाले. संस्थेच्या यावर्षीच्या 27 व्या शास्त्रीय संगीत स्पर्धेत एकूण 27 स्पर्धकांनी भाग घेतला. या पहिल्या फेरीतून 15 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असून ही अंतिम फेरी रविवार, दि. 15 जानेवारी रोजी सकाळी 10.00 ते 1.00 आणि दुपारी 2.00 ते 5.00 या दरम्यान पनवेल कल्चरल असोसिएशनच्या सभागृहात पार पडणार आहे. स्पर्धेनंतर लगेच निकाल जाहीर केला जाईल आणि पारितोषिक वितरण ही पार पडेल. स्पर्धकांसाठी जरी ही स्पर्धा असली तरी श्रोत्यांसाठी हे एक ‘युवा संगीत संमेलन’ असेल. विशेष म्हणजे या अंतिम फेरीत श्रोते हेही परीक्षकाच्या भूमिकेत असणार आहेत. जे श्रोते सर्व स्पर्धकांचे गायन ऐकतील ते त्यांना आवडलेल्या स्पर्धकाची ‘श्रोते हेही परीक्षक’ योजनेतील दोन हजार रुपयांच्या खास पारितोषिकासाठी निवड करु शकतील. त्यामुळे रसिकांनी या स्पर्धा कम संगीत संमेलनास उपस्थित राहून श्रवणानंद तर घ्यावाच पण युवा कलाकारांनाही प्रोत्साहित करावे असे आवाहन स्पर्धा समिती प्रमुख नंदकुमार कर्वे यांनी केले आहे.
Comments