आगामी पनवेल महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी सुरू...


पनवेल काँग्रेस भवनात महापालिका निवडणुकीसह विविध महत्वाच्या विषयांवर बैठक संपन्न...

पनवेल: प्रतिनिधी
          
आगामी पनवेल महापालिका निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून त्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाने मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. याबाबत काँग्रेसची रणनीती व पुढील ध्येय धोरणासंदर्भात पनवेल शहरातील काँग्रेस भवन कार्यालयात आज (शनिवार दि.२४ डिसेंबर) पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महत्वाची बैठक संपन्न झाली. यावेळी उपस्थित पदाधिकारी व नेतेमंडळींनी महापालिका निवडणुकीसह विविध विषयांवर चर्चा करून पुढील वाटचालीसंदर्भात भुमिकाही स्पष्ट केली. 
        या बैठकीत मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेबाबत अभिनंदनाचा ठराव घेतला. तसेच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने दिलेल्या सुचनेनुसार 'हात से हात जोडो' अभियानाबद्दल विस्तारित माहिती दिली. हे अभियान २६ जानेवारी २०२३ ते २२ मार्च २०२३ यादरम्यान पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शहरांमध्ये तसेच पनवेल तालुक्यात संपन्न होणार असून त्यादृष्टीने नियोजन समिती नेमण्यात आली. अभियानांतर्गत प्रत्येक शहरात बाईक व कार रॅलीसह पदयात्रेची योजनाही यावेळी आखण्यात आली.
         त्याचबरोबर यावेळी नुकत्याच पार पडलेल्या पनवेल व उरण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीत काँग्रेसची ताकद सिद्ध करणाऱ्या शिलेदारांचा सन्मानही करण्यात आला. तसेच पनवेलमध्ये काँग्रेस पक्षात नागरिकांचा ओढा वाढला असून इतर पक्षातून काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश कार्यक्रमही यावेळी पार पडला. बैठकीनंतर पनवेल व रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जेष्ठ नेत्या अंजलीदेवी पालकर व पनवेल शहर ब्लॉक अध्यक्ष लतीफ शेख यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
          याप्रसंगी काँग्रेसचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष अभिजीत पाटील, तालुकाध्यक्ष नंदराज मुंगाजी, पनवेल अर्बन बँकेचे संचालक अरविंद सावळेकर, जनार्दन पाटील, विमल गायकवाड, महिला जिल्हाध्यक्षा निर्मला म्हात्रे, शहराध्यक्ष लतीफ शेख, जिल्हा सरचिटणीस मल्लिनाथ गायकवाड, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नोफील सय्यद, युवक जिल्हाध्यक्ष हेमराज म्हात्रे, जेष्ठ नेत्या अंजलीदेवी पालकर, प्रताप गावंड, माया अहिरे, प्रेमा अपाचा, आबा खेर, राकेश जाधव, प्रितेश शाहू यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोट:
आगामी पनवेल महापालिका निवडणुकीत काँग्रेसने कंबर कसली असून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेण्यात येतील. काँग्रेस पक्षाला महापालिका निवडणुकीत घवघवीत यश मिळेल याची खात्री आहे. गेल्या पाच वर्षात सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियपणामुळे पनवेलचा विकास खुंटून पनवेल अधोगतीच्या दिशेने जात आहे. त्यामुळे पनवेलची सुज्ञ जनता भाजपच्या कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नसून यावेळेस निश्चितच परिवर्तन घडेल याची मला खात्री आहे.
- अभिजीत पाटील, पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष
Comments