उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महापालिकेकडे मागणी ...
पनवेल दि.२७ (संजय कदम) : तालुक्यातील वळवली खालचा तलावाचे तसेच कळंबोली रेल्वे स्टेशनकडे जाणारा रस्ता तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगरपालिकेकडे निवेदनाद्वारे केली आहे.
यावेळी पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास गावडे, प्रभागाधिकारी कवठे यांची शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांच्यासोबत शाखाप्रमुख प्रवीण पाटील, ज्येष्ठ शिवसैनिक अशोक पाटील, बळीराम पाटील आदींनी भेट घेतली तसेच निवेदन दिले. यानिवेदनात त्यांनी म्हटले आहे कि, वळवली गांव हे विकासापासून पूर्णपणे राहिले असून गावातील परंपरागत तलाव हे वाडवडिलांपासून असून महानगरपालिका स्थापन झाल्यापासून या तलावाकडे कायमचे दुर्लक्ष झालेले आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तलावावर करोडो रुपये खर्च करीत असून वळवली गावातील परंपरागत तलावावर एक दमडीही खर्च केलेले नाही. तसेच वळवली वरून कळंबोली रेल्वे स्टेशन व तलावाकडे जाणाऱ्या रस्त्याची १९९५ पासून देखभाल दुरुस्ती ही सिडको करीत होती. परंतु महानगरपालिका स्थापन झाल्यापासून ती कायम दुर्लक्षीत झाली आहे. त्यामुळे तातडीने याची दखल घेवून तलावा करिता निधी मंजूर करावा व रस्त्याचे काम तातडीने सुरू करावा अशी मागणी तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांनी केली आहे.
फोटो : पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त कैलास गावडे व प्रभागाधिकारी कवठे यांना निवेदन देताना तालुकाप्रमुख विश्वास पेटकर यांच्यासह इतर पदाधिकारी