प्रभू रामचंद्रांशी राहुल गांधींची तुलना केल्याबद्दल कॉंग्रेसने माफी मागावी ...


भाजपा प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांची  मागणी 
पनवेल : - नॅशनल हेराल्ड भ्रष्टाचारप्रकरणी जामीनावर मुक्त असलेल्या, वारंवार महापुरुषांची बदनामी करून माफी मागणाऱ्या आणि सतत खोटे बोलून जनतेत संभ्रम पसरविणाऱ्या कर्तृत्वशून्य राहुल गांधींची तुलना महापराक्रमी, सत्यवचनी आणि हिंदूंचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रांशी करून पुन्हा प्रभू रामचंद्रांचा अपमान केल्याबद्दल काँग्रेसने देशाची माफी मागावी , अशी मागणी  भाजपाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी केली आहे.
 
श्रीरामांचे अस्तित्वच नाकारण्यापासून सुरुवात करत आता राहुल गांधींची तुलना प्रभू रामचंद्रांशी करून श्रीरामांचे अवमूल्यन करण्याचा व हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न म्हणजे गांधी परिवारापुढे गुडघे टेकण्याच्या लाळघोट्या राजनीतीची अधोगती आहे, असेही विक्रांत पाटील यांनी  म्हटले आहे. 
 
विक्रांत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की , माजी केंद्रीय  मंत्री सलमान खुर्शिद यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची केलेली प्रशंसा म्हणजे गांधी  घराण्याचे तळवे चाटण्याच्या स्पर्धेत पुढे राहण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. काँग्रेसचे सर्वच नेते गांधी घराण्यासमोर लाळघोटेपणा करण्यासाठी चढाओढ करत असतात. पण त्याकरिता राहुल गांधींना श्रीरामांची उपमा देणे हा प्रभू रामचंद्रांचा अपमान आहे. सर्व गुणांचा आदर्श असलेल्या प्रभू रामचंद्रांशी कोणाचीही तुलना होऊ शकत नाही. श्रीरामांचे अस्तित्व नाकारून हिंदूंच्या भावनांची खिल्ली उडविणाऱ्या, श्रीरामांच्या जन्मस्थळावर प्रश्नचिन्हे उमटविणाऱ्या आणि सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करून प्रभू रामचंद्रांच्या अस्तित्वावर शंका घेणाऱ्या काँग्रेसने राजकारणासाठी हिंदूंच्या पवित्र श्रद्धास्थानांना वेठीस धरून आपल्या कर्तृत्वहीन नेत्यांची तुलना त्यांच्याशी करीत हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अपमान करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. राहुल गांधींची तुलना श्रीरामांशी करून केवळ हिंदूंच्याच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या भावना काँग्रेसने दुखावल्या आहेत, असा आरोपही त्यांनी केला. याच सलमान खुर्शिद यांनी आपल्या पुस्तकात हिंदुत्व विचारांची तुलना आयसिस आणि बोको हरम या कट्टरवादी मुस्लिम अतिरेकी संघटनांशी केली होती. हिंदुत्वाचा वापर राजकारणासाठी केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता, आणि आता देशात हिंदू एकवटत असल्याचे दिसताच त्यांनाही श्रीरामांची आठवण झाली , असे ते म्हणाले.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमध्ये सतत पराभवाची मालिका सुरू आहे. भ्रष्टाचाराचा बुजबुजाट झालेल्या आणि अपरिपक्व नेतृत्वामुळे गळती लागलेल्या काँग्रेसच्या अपयशास कारणीभूत असलेल्या राहुल गांधींची तुलना पराक्रमी, अजिंक्य रामचंद्रांशी करणाऱ्या खुर्शिद यांच्या लाळघोटेपणातून काँग्रेस नेत्यांची हतबलता स्पष्ट झाली आहे, पण देशातील हिंदू जनता हे लाळघोटे राजकारण मान्य करणार नाही, अशी खोचक टिपणी विक्रांत पाटील यांनी केली.
Comments