अभिजीत पाटील यांनी बॅ.अंतुलेंच्या आठवणींना दिला उजाळा...
मुरुडमध्ये बॅ.अंतुलेंच्या स्मृतिदिनानिमित्त विविध समाजोपयोगी कार्यक्रम संपन्न...


बॅ.अंतुलेंच्या पाया पडलो त्यांनी पाठीवर हात ठेवला अन आशिर्वाद मिळाला

लहानपणापासून बॅ.अंतुले साहेबांचे किस्से सतत ऐकुन,वाचुन प्रेरणा मिळायची

मुरुड / प्रतिनिधी :- 
        कार्यक्रम आणि व्यासपीठ जरी राजकीय नसले तरीही बॅरिस्टर अंतुलेंचे आणि माझे नाते हे राजकारणामुळेच तयार झाले आहे. लहानपणापासून मी वडिलांकडून बॅ अंतुलेंचे किस्से ऐकत आलो. आमचे घराणे काँग्रेसचे असल्यामुळे साहेबांचे अनेक किस्से ऐकायला मिळायचे आणि त्यातून प्रेरणा मिळायची. टीव्ही आणि वर्तमानपत्रे कमी होती परंतु वाचन भरपूर होते. वडील, आजोबा आणि नातेवाईक यांच्याकडूनही खूप ऐकायला मिळायचे.  त्यामुळे साहेबांचे किस्से सतत ऐकुन वाचुन प्रेरणा मिळायची, असे प्रतिपादन पनवेल शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी केले. ते मुरुड येथे बॅ.ए आर अंतुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज (शनिवार दि.३ डिसेंबर) आयोजित कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
          ते पुढे म्हणाले, ज्यावेळेस मी राजकारणात सक्रिय काम चालू केले त्यानंतर साहेबांना भेटण्याचा अनेकदा योग आला. पहिल्या भेटीदरम्यान मी त्यांच्या जेव्हा पाया पडलो तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवर हात ठेवला, आशिर्वाद मिळाला. आज हा प्रसंग सांगताना देखील भरून आले. माझे हे दुर्दैव की, मला उशिरा साहेबांचा सहवास लाभला पण सुदैव हे मानतो की काहींना लाभला नाही इतका मला त्यांच्या अखेरच्या ५ वर्षातील अविस्मरणीय सहवास लाभला. बॅरिस्टर अंतुले साहेबांनी लिहिलेल्या 'अपॉइंटमेंट ऑफ चीफ जस्टीस' आणि 'महाजन रिपोर्ट अनकव्हर' या पुस्तकांची मूळ प्रत वाचनालयात किंवा कॉलेजमध्ये ठेवून त्याच्या अनेक प्रती तयार करून त्या प्रत्येक कॉलेजना वाचनासाठी द्या. ही खुप दुर्मिळ लिहिलेली पुस्तके असुन यात सत्य मांडलेले आहे. आजच्या लेखकांमध्ये कदाचितच सत्य लिहिण्याची हिम्मत असते. परंतु ते सत्य लिहिण्याचे काम साहेबांनी त्याकाळीच केले आहे. बॅरिस्टर साहेबांसोबतच्या आठवणी खूप साऱ्या आहेत. काल त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आंबेतला जाऊन स्मृतीस्थळाहून आम्ही नवी ऊर्जा घेऊन आलो.
           महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा माजी केंद्रीय मंत्री बॅ.ए.आर. अंतुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालय मुरुड-जंजिरा आणि क्रिस्टल आय सेंटर, माझगाव-मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी, सवलतीच्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मा वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आज (शनिवार दि.३ डिसेंबर) सकाळी १० वाजता मुरुड येथे वसंतराव नाईक कला व वाणिज्य महाविद्यालयात बॅ ए आर अंतुलेंना आदरांजली अर्पण करून शिबिराची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर माजी आमदार मुश्ताकभाई अंतुले, पनवेल शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील, डॉ अनिस भावनगरवाला, जेष्ठ नेते आर सी घरत, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सुदाम पाटील, श्रद्धा ठाकूर, वासंती उमरोटकर, भाई म्हात्रे, प्रताप गावंड, माजी नगराध्यक्षा नेहा पाटील, स्मिता खेडेकर, प्राचार्य उल्हास चव्हाण यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
         या शिबिराचा शुभारंभ कोकण उन्नती मित्र मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार मुश्ताकभाई अंतुले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला. या शिबिराचा मुरुड व परिसरातील दृष्टिदोष असणाऱ्या असंख्य नागरिकांनी लाभ घेतला असून हे शिबीर यशस्वी करण्यासाठी ऍड. इस्माईल घोले, सुभाष महाडीक, वासंती उमरोटकर, आरती गुरव, महाविद्यालय विकास समिती, प्राचार्य डॉ.एम ए नगरबावडी, उप प्राचार्य प्रा.डॉ. विश्वास चव्हाण यांच्यासह प्राध्यापक, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी आदींनी विशेष मेहनत घेतली.
Comments