मुख्य जिल्हा न्यायाधीश मा.श्रीमती एस.एस. सावंत
पनवेल वैभव / दि.१३ (संजय कदम) :- समाजाच्या सर्वच स्तरापर्यंत शासनाच्या विविध योजना पोहोचणे गरजेचे आहे यासाठी महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज पनवेलच्या वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विविध शासकीय योजनांचा महामेळावा आयोजित केला असून तो सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल असे मत मुख्य जिल्हा न्यायाधीश तथा रायगड जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष मा. श्रीमती एस. एस. सावंत यांनी केले.
या कार्यक्रमास मुख्य जिल्हा न्यायाधीश मा. श्रीमती एस. एस. सावंत यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, पनवेल परिमंडळ २ पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, रायगड जिल्हा सहकारी वकील भूषण साळवी, जिल्हा व सत्र न्यायधीश-१ रायगड अशोककुमार भिल्लारे, जिल्हा न्यायाधीश- १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश पनवेल जयराज वडणे, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव अमोल शिंदे, उपजिल्हाधिकारी सर्जेराव पाटील, पनवेल बार असोसिएशनचे अध्यक्ष एड. मनोज भुजबळ, प्रांताधिकारी राहुल मुंडके, तहसीलदार विजय तळेकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, श्री साई संस्थान वहाळचे रवींद्र पाटील, ज्येष्ठ पत्रकार विजय कडू आदींसह इतर मान्यवर व मोठ्या प्रमाणात या योजनेचा लाभ व मार्गदर्शन घेण्यासाठी जिल्ह्यातून आलेले नागरिक व वकील उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्य जिल्हा न्यायाधीश मा. श्रीमती एस. एस. सावंत यांनी सांगितले कि, शासकीय योजनांची माहिती सर्वांपर्यंत पोहोचल्याने त्याचा फायदा सर्वांनाच होतो. रायगड जिल्ह्यात अश्याप्रकारे मार्गदर्शन वेळोवेळी या योजनेद्वारे करण्यात येते. आजचा हा कार्यक्रम सुद्धा कौतुकास्पद आहे त्यामुळे अनेकांना विविध योजनांचा लाभ मिळाल्याचे त्यांनी नमूद केले. तर यावेळी बोलताना जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले कि, नागरिकांना लाभदायी ठरणाऱ्या १८ योजनांचे स्टॉल्स आज येथे उभारण्यात आलेले असून, ३१ ऑक्टोबर पासून सुरू असलेल्या या कार्यक्रमाची सांगता आज होत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तळागाळात पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच यापुढील महामेळावा महाड येथे भरवण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपामध्ये लाभार्थींना विविध शासकीय दाखले, धनादेश आदींचे वाटप करण्यात आले.
चौकट
सामान्य माणूस हा सुद्धा पोलिसच असतो. जनजागृत राहून त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे. सर्वसामान्य नागरिकांसाठी पोलीस ठाण्यामध्ये सुद्धा मदत कक्ष व समुपदेशन आदी उपक्रम राबवले जातात. आजच्या तरुण पिढीला गुन्हेगारी व व्यसनमुक्त करण्यासाठी आमचा विशेष प्रयत्न असेल. - सोमनाथ घार्गे (रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक)
चौकट
पनवेल विधी सेवा समितीच्या वतीने सर्वांना न्याय मागण्याचा अधिकार प्राप्त व्हावा या उदात्त हेतूने तळोजा कारागृहात जाऊन तब्बल २८७५ कैद्यांची एका प्रश्नावली द्वारे मुलाखती घेऊन त्यांना कायदेविषयक मार्गदर्शन केले.
ॲड मनोज भुजबळ (पनवेल बार असोसिएशन अध्यक्ष)
चौकट
पनवेल विधी सेवा समितीने आदिवासी बांधवांच्या २५ प्रमुख व्यक्तींना कायदेविषयक मार्गदर्शन केले, तसेच त्यांच्या न्याय हक्कांचे बाबत त्यांना जागृत केले व त्यांच्या साठी विशेषत्वाने असलेल्या कायद्यांची त्यांना जाणीव करून दिली. मला खात्री आहे की हे 25 आदिवासी बांधव किमान अडीच हजार आदिवासींपर्यंत हे ज्ञान पोहोचवून त्यांच्या अधिकारांची त्यांना जाणीव करून देतील. - जयराज वडणे (जिल्हा न्यायाधीश- १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश)
फोटो : पनवेल विधी सेवा समिती आणि पनवेल बार असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने विविध शासकीय योजनांचा महामेळावा