कार्तिकी छटपूजेचा करंजाडेत भक्तिमेळा ; शेतकरी कामगार पक्ष करंजाडेकडून आयोजन..

उत्तर भारतीय बांधवांनी सहकुटुंब केली विधिवत पूजा 

पनवेल/प्रतिनिधी -- सालाबादप्रमाणे शेतकरी कामगार पक्ष करंजाडेच्या वतीने सरपंच रामेश्वर आंग्रे व उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्यावतीने  करंजाडे परिसरात वास्तव्यास असलेल्या उत्तर भारतीय बांधवांनी सहकुटुंब हजेरी लावून करंजाडे नदीवर  दुग्धाभिषेक अर्पण करत सूर्याला अघ्र्य देऊन विधिवत छटपूजा केली. यावेळी उसळलेल्या आबालवृद्धांच्या गर्दीने संपूर्ण परिसरात भक्तिमेळा फुलला होता. उत्तर भारतात दरवर्षी कार्तिक महिन्याच्या संध्येला मोठय़ा जल्लोषात 'कार्तिकी छटपूजा' साजरी केली जाते.

यावेळी कोकण शिक्षक मतदार संघांचे आमदार बाळाराम पाटील, पनवेल नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष उद्योजक जे.एम. म्हात्रे, सरपंच रामेश्वर आंग्रे, उपसरपंच योगेंद्र कैकाडी, मंगेश बोरकर यांच्यासह कार्यकर्ते, सदस्य महिला मोठया संख्येने उपस्थित होते.

छटपूजेचा सण सलग चार दिवस साजरा केला जातो. यामध्ये उत्तर भारतीय हिंदी भाषिक बांधव 36 तासांचा निर्जळी उपवास करतात. महिला-पुरुष दोघेही कडक उपवास करतात. कार्तिक महिन्याच्या चतुर्थीपासून छटपर्वाला प्रारंभ होतो आणि सप्तमीला या पर्वाची सांगता होते. 36 तासांच्या उपवासानंतर महिला व पुरुष नदीकाठी एकत्र येऊन सूर्यदेवतेला अघ्र्य देतात आणि माता छटीची पूजा करतात. रविवारी (दि.30) संध्याकाळी करंजाडे परिसरातील सर्व उत्तर भारतीय नागरिकांनी दुपारी चार वाजेपासून तर सायंकाळी सात वाजेपर्यंत करंजाडे नदीवर हजेरी लावून छटपूजेचा विधी पूर्ण केला. उसाच्या बांड्यांची मोळी बांधून ती नदीपात्रात उभी करत दीप प्रज्वलित करत सूर्याला दूध व पाण्याचा अघ्र्य देत दाम्पत्यांनी विधिवत पूजा केली. 

यावेळी आमदार बाळाराम पाटील, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे यांनी आपले मनोगत व्यक्त करीत नागरिकांना 'छट पर्व'च्या शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल शहर पोलिसांनी परिसरात चोख बंदोबस्त ठेवला होता. पार्किंगची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दुपारी चार वाजेपासून उत्तर भारतीय नागरिक सहकुटुंब नदीवर येत होते. विविध फळांसह पूजेचे साहित्य मांडून महिला व पुरुषांनी विधिवत पूजा केली. यावेळी नदीवर जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते.
Comments