सिडको वसाहतींमधील पाणीपुरवठ्याबाबत ठराविक मुदतीत उपाययोजना करा अन्यथा आंदोलन करणार -आमदार प्रशांत ठाकूर
अन्यथा आंदोलन करणार -आ. प्रशांत ठाकूर
पनवेल( प्रतिनिधी) सिडको वसाहतींमधील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा यासाठी ठोस उपाययोजना ठराविक मुदतीत कराव्यात; अन्यथा आमचे सरकार असले तरी आम्ही आंदोलन करू, असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 21) सिडकोच्या बैठकीत दिला. दिवाळीत गरज असेल तिथे सिडकोने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.
पनवेल महापालिका हद्दीतील सिडको वसाहतींमध्ये अनेक दिवस कमी पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी दुपारी सिडको भवनमध्ये मुख्य अभियंता राजेंद्र धायकर, अधीक्षक अभियंता मूळ, कार्यकारी अभियंता चौथाणी यांच्याबरोबर बैठक घेतली. या बैठकीस माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी नगरसेवक प्रकाश बिनेदार, अ‍ॅड. मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे, संतोष शेट्टी, डॉ. अरुणकुमार भगत, निलेश बावीस्कर, समीर ठाकूर, एकनाथ गायकवाड, माजी नगरसेविका चारुशीला घरत, राजश्री वावेकर, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले की, सिडको वसाहतींमध्ये सतत पाण्याचा तुटवडा भासत असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करणे आवश्यक आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व सिडको सतत वेगवेगळी करणे देत असते. आता ते थांबवा. तुमच्या अडचणी तुम्ही सोडवा, पण नागरिकांना पुरेसे पाणी द्या. त्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करा. पाणीवाटप स्वयंचलित पद्धतीने करा. ज्या प्रभागातील पाण्याच्या टाक्या पाडून टाकल्या आहेत त्या प्राधान्याने बांधा. पाइपलाइन बदलायची असेल किंवा विद्युतपुरवठ्यासंबंधी अडचणी असतील तर त्या ठराविक वेळेत पूर्ण करा व कधी पूर्ण करणार त्याची प्रेसनोट काढून सिडकोने पत्रकारांना द्यावी. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
दिवाळी असल्याने आता कोठेही पाणी कमी पडू देऊ नका. ज्या भागात पाणी मिळत नसेल तेथील नागरिकांना तातडीने टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्याची मागणीही या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.
सिडकोचे मुख्य अभियंता राजेंद्र धायकर यांनी, पाडलेल्या पाण्याच्या टाक्यांचे काम लवकरच सुरू होणार असून इतरही कामांच्या टेंडरची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती दिली. या वेळी अनेक माजी नगरसेवकांनी तुमच्याकडे पुरेसे पाणी नसल्याने तुम्ही बिल्डरना ओसीसाठी ना हरकत दाखला देऊ नका. त्यामुळे पाण्याची मागणी वाढत आहे. त्याचा परिणाम एकूण पाणीपुरवठ्यावर होत असल्याचे निदर्शनास आणले.
Comments