ऐन दिवाळीत खांदा वसाहतीत पाणीटंचाई :शेतकरी कामगार पक्ष आक्रमक...


पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांचा इशारा....
पनवेल / प्रतिनिधी:- मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना सुद्धा खांदा वसाहतीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे दिवाळीचा सण सुरू झाला असतानाही सिडकोकडून मागणी प्रमाणे पाणी दिले जात नाही. यामुळे रहिवाशांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा पक्षाचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे.

नवीन पनवेल आणि खांदा वसाहतीत नेहमीच पाण्याची ओरड आहे. मध्यंतरी पाणीपुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न सिडकोकडून करण्यात आला. परंतु मागणीच्या तुलनेत पाणी कमी मिळत असल्याने टंचाईसदृश परिस्थिती वर्षभर असते. मात्र गेल्या आठवड्यापासून सिडकोच्या पीएल5 टाईपच्या इमारतींमध्य पाणीच येत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तसेच सेक्टर-9 येथील इमारतींमध्ये तीव्र पाणीटंचाईला रहिवासी सामोरे जात आहेत. दिवाळीचा सण सुरू झाला असतानाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 18 ऑक्टोबर रोजी शटडाऊन घेतला होता. दोन दिवसांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होईल असे आश्वासन एम जे पी कडून देण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात आठ दिवस झाले तरी खांदा वसाहतीत पाणीपुरवठा पूर्वीप्रमाणे होत नाही. मागणीच्या तुलनेमध्ये अत्यल्प पाणी येत आहे. त्यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात बोंबाबोंब सुरू आहे. त्यामुळे शेतकरी कामगार पक्ष आक्रमक झाला आहे. पक्षाचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष महादेव वाघमारे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता सागर जगदाळे यांच्याशी संपर्क साधून या ठिकाणी पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही तिथे थोडा त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करा अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा सिडको कार्यालयावर मोर्चा काढून रहिवासी आंदोलन करतील असा निर्वाणीचा इशारा त्यांनी दिला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने डाऊन घेतल्यामुळे पाणीपुरवठा कमी दाबाने होत आहे. परंतु सिडकोकडून पंपिंग केले जात आहे ज्या ज्या ठिकाणी अडचणी असतील त्या त्वरित निकाली काढण्यात येतील अशी ग्वाही वाघमारे यांना सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र जर पाणीपुरवठा दिवाळीमध्ये योग्य पद्धतीने होत नसेल तर मोठे आंदोलन करू अशी भूमिका शेतकरी कामगार पक्षाने खांदा वसाहतीतील पाणी प्रश्नासंदर्भात घेतली आहे.
Comments