पनवेलचे आराध्य जागृत देवस्थान जाखमाता देवी ; पनवेलवासीयांचे रक्षण करणारी गावदेवी माता..
पनवेलवासीयांचे रक्षण करणारी गावदेवी माता

पनवेल दि. २९ ( वार्ताहर )  :  सन 1942 ते 45 च्या कालावधित पनवेल गावात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते.यावेळी प्लेगच्या साथीला घाबरुन अनेकांनी पनवेल गाव सोडुन अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला परंतू पनवेलच्या जाखमाता देवीवर ज्यांची अपार श्रध्दा होती असे भक्त देवीच्या मंदीर परीसरात देवाच्या कृपाछत्राखाली वास्तव्य करुन राहीले त्यांच्यावर प्लेगच्या साथीचा कोणताही परीणाम झाला नाही हया दृष्टांतापासुन जाखमाता देवीचे महात्म्य पनवेलच्या आजुबाजुच्या गावातुन पोहचले .तेव्हा पासुन पनवेलचे जागृत देवस्थान व पनवेलकरांचे दुष्टांपासुन रक्षण करणारी जाखमाता देवी (गावदेवी)ही भक्तांची माता म्हणुन हदयस्थानी अढळ झाली.या देवीच्या मंदीरात नवरात्र उस्तव मोठया भक्तीभावाने व जल्लोषात साजरा केला जात आहे.

             पनवेलची जागृत माता अन पनवेलकरांचे संकटापासुन रक्षण करणारया देवीचे मुळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद ईतीहासात सापडते.नवसाला पावणारी व रोगराई पासुन भक्तांचे रक्षण करणारी जाखमाता देवी असल्याची अपार श्रध्दा पनवेलवासीयांची आहे.या देवीचे पुजारी व जाखमाता मंदीराचे व्यवस्थापक देवीची पुजाअर्चा व देविच्या मंदीराची सर्व पाहतात.त्यांचेकडुन देवीबाबत भक्तांची असणारी श्रध्दा त्यांनी विशद केली.प्लेगच्या साथीपासुन पनवेलकरांचे देवीचे रक्षण केल्याने देवी जागृत असल्याची श्रध्दा पनवेलवासीयांची झाल्याने त्यांनी देवीची पालखीतुन मिरवणुक काढली त्या दिवसापासुन देवीची दरवर्षी चैत्र महीन्यात पालखीचा सोहळा केला जातो.या सोहळयात पनवेल सह आजुबाजुच्या गावातील देवीचे भक्त सहभागी होतात.सदरचा पालखी सोहळा हा रात्री 9 वाजल्यापासुन सुरू केला जातो तो संपुर्ण पनवेलमधुन फिरुन पहाटेपर्यत देवळात आणण्याची प्रथा गेल्या सात ते आठ दशकापासुन सुरू आहे.यावेळी देहभान विसरुन भाविक पालखीच्या मिरवणुकीत भजन आरत्या व देवीचा जयजयकार करीत असतात.परंतू आता कायदयाचे बंधन या पालखी सोहळयाला लागल्याने पालखी मध्यरात्री बारा वाजेपर्यतच फिरवली जात आहे.नवरात्र उस्तवात नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठया संख्येने गर्दी होत असते.देवीला साडीचोळी नेसवीणारे व ओटी भरणारे भाविक मोठया प्रमाणावर असल्याचे मंदीराचे पुजारी किसन भोपी सांगतात. देवीच्या नवसात विविधता आढळुन येत आहे.यामध्ये काही भक्त देवीला पाळण्याचा नवस बोलतात तर काही भक्त जन्मलेल्या मुलाचे व्यंग बरे होण्यासाठी साकडे घालुन आपल्या आर्थीक कुवतीनुसार चांदी तांबे किंवा लाकडी अवयवयांच्या प्रतिकृती देविला अर्पण करुन आपले नवस फेडतात.गावात जन्माला आलेले बाळ प्रथम देवीच्या पायावर ठेवल्याशिवाय गावाबाहेर न्यायचे नाही असा प्रघात अजुनही पनवेल गावात परंपरेने चालत आलेला पाहावयास मिळतो.नवविवाहीत दापंत्यही प्रथम देवीच्या दर्शनासाठी येण्याचा प्रघात आहे. या देवीचे चैत्र महीन्यात निघणारी पालखी सोहळा व आश्‍विन महीन्यातील नवरात्रोत्सव हे दोन उस्तव दरवर्षी मोठया श्रध्देने व जल्लोषात साजरे केले जात आहेत.तसेच दर मंगळवारी व शुक्रवारी देवीची सामुदायीक आरती केली जात असते.जाखमाता देवीच्या जुन्या आख्यायिका लक्ष्मीबाई लक्ष्मण भोपी हयांच्याकडुन त्यांनी आपल्या किसन भोपी, अरुण भोपी यांना सांगुन ठेवल्या आहेत.त्यामध्ये देवीचे वाहन हे वाघ होते.व देवी वाघावर बसुन तेव्हाचे पानवेल म्हणजे आजच्या पनवेल गावातुन फेरफटका मारुन गावाचे रक्षण करीत असे.देवीचा वाघ देवीच्या मंदीरात नित्यनेमाने येत असे .एकदा देवीचा वाघाला देवळात जाण्यास विलंब झाल्याने तो गोंधळुन गेला अन पनवेलमधिल नानासाहेब पुराणिकांच्या घरात शिरला.वाघाला पाहुन लोक घाबरले.त्यावेळी जुन्या प्रांत कार्यालयासमोर  राहणारया टी.पी.श्रृंगारपुरे यांनी त्यांच्याकडील बंदुकीने गोळया घालुन ठार मारल्याचे सांगीतले जाते.या देवीच्या पुरातन मंदीराचा जिर्णोध्दार केला गेला आहे.नवरात्रि उस्तवात हजारो भाविक देवीच्या दर्शनासाठी एकच गर्दी करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
फोटो - गावदेवी माता
Comments