मुद्देमाल मिळाल्यानंतर माता भगिनींच्या डोळ्यात तरळणारे आनंदाश्रू हेच आमच्या परिश्रमाचे फलित - पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह ..
पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह ..

पनवेल / प्रतिनिधी

      नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत परिमंडळ 2 मधील मुद्देमाल हस्तांतरण आणि आयएसओ मानांकन प्रमाणपत्र वितरण सोहळा येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके येथे आयोजित करण्यात आला होता. गुरुवार दिनांक 15 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शानदार सोहळा संपन्न झाला. पोलीस सह आयुक्त डॉ.जय जाधव आणि अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे विभाग महेश घुर्यें यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली. पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
      नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोन अंतर्गत दहा पोलीस ठाण्यांमध्ये 1 जानेवारी 2022 ते 31 ऑगस्ट 2022 दरम्यान दाखल असलेल्या विविध गुन्ह्यांमध्ये  एकूण 8 कोटी 88 लाख सत्तर हजार दोनशे तेहत्तीस रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्याची अतिशय उत्कृष्ट कामगिरी करण्यात आली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालापैकी 4 कोटी 49 लाख 72 हजार 264 किमतीचा मुद्देमाल न्यायिक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित फिर्यादी व्यक्तींना हस्तांतरित करण्यात आले.
      यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह म्हणाले की, गुन्हे अन्वेषणातून हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रोख रक्कम, किमती वस्तू, मूल्यवान दाग दागिने आहेत. परंतु यात काही दागिने असे असतात की ज्यांचे नागरिकांसोबत अत्यंत संवेदनशील नाते निर्माण झालेले असते. काही दागिने वंशपरंपरागत पद्धतीने चालत येऊन आपल्यापाशी आलेले असतात. अशा वस्तूंची चोरी झाली की पूर्वजांची निशाणी हरवल्याचे दुःख हे चोरीपेक्षा कित्येक पटींनी अधिक असते. असे दागिने परत केल्यानंतर फिर्यादींच्या डोळ्यांमध्ये जे आनंदाश्रू तरळत आहेत तेच आमच्या खात्याने घेतलेल्या परिश्रमाचे खरे फलित आहे असे मला वाटते.
       गुगल ग्लोबल कंपनीच्या वतीने ISO मानांकन परीक्षण करण्यात आले. सदर आस्थापनाचे  मुख्याधिकारी श्रीबास दत्ता आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, जनसेवेसाठी तहान भूक हरपून कार्यरत असणारे पोलीस आहेत म्हणून आपण निश्चिंत असतो.माझ्या लेखी पोलिस हे खरे हिरो आहेत.
       कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील यांनी प्रास्ताविक सादर केले.
कॉलिटी मॅनेजमेंट सिस्टीम च्या विविध निकषांच्या माध्यमातून 6 पोलीस स्थानक कार्यालयांना आयएसओ ,9001:2015 मानांकन बहाल करण्यात आले. पोलीस उपयुक्त परिमंडळ दोन पनवेल कार्यालय, सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल कार्यालय, पनवेल तालुका पोलीस ठाणे, कामोठे पोलीस ठाणे, तळोजा आणि खारघर पोलीस ठाणे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
      सदर सोहळ्याला मोहल्ला शांतता कमिटी, महिला दक्षता समिती सदस्यांचे मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. पोलीस आयुक्त बिपिन कुमार सिंह,पोलीस सह आयुक्त डॉ.जय जाधव आणि अप्पर पोलीस आयुक्त, गुन्हे विभाग महेश घुर्यें, श्री बास दत्ता,पोलीस उप आयुक्त शिवराज पाटील,सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे आदी मान्यवरांच्या सह पोलीस स्थानकांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी, फिर्यादी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

चौकट
ओएनजीसी कंपनीचे दातृत्व

ओएनजीसी कंपनीच्या वतीने नावाशिवा पोलीस स्टेशन येथे आस्थापनात झालेल्या चोरीची तक्रार नोंदविली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक भटे यांच्या मार्गदर्शनाखाली कुशल गुन्हे अन्वेषणाच्या माध्यमातून गुन्ह्याची उकल करण्यात आली. कंपनीचा मुद्देमाल त्यांच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आला. पोलीस खात्याने दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि कार्य कुशल्येमुळे कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी नवी मुंबई पोलीस परिमंडळ 2 विभागास रुपये एक लाख रुपयाचे विशेष पारितोषिक घोषित केले आहे. लवकरच सदर पारितोषकाचा धनादेश आयुक्त बिपिन कुमार सिंह यांच्या ताब्यात देणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कळविले.


चौकट
आपत्कालीत घटनेमध्ये तातडीने मदत पुरविणाऱ्या अधिकाऱ्यांचा करण्यात आला सत्कार.

अनंत चतुर्दशीच्या दिवशी पनवेल कोळीवाडा येथे शॉक लागून 11 नागरिक जबर जखमी झाले होते. यात एका नऊ महिन्याच्या मुलीचा समावेश देखील होता. यावेळी पनवेल शहर पोलीस स्थानकातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने,पोलीस निरीक्षक संजय जोशी,सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे यांनी तातडीने मदत पोहोचवत या जखमींना मृत्यूच्या दाढेतून बाहेर खेचून आणले.
त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
Comments