अलिबाग-पनवेल साध्या बसचे प्रमाण वाढविण्याची नियमित प्रवाशांची मागणी ; आ.महेंद्र दळवी यांना दिले निवेदन..

आमदर महेंद्र दळवी यांना दिले निवेदन
अलिबाग/प्रतिनिधी
अलिबागहून पनवेलला नियमित बसने प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या अडचणींचे निवेदन अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना प्रवासांच्या वतीने देण्यात आले. 
अलिबागहून पनवेलला प्रवास करणारे शासकीय कर्मचारी तसेच इतर प्रवाशांची संख्या मोठया प्रमाणात आहे, मात्र अलिबागहून पनवेलला लोकल बससेवा नियमित सुरु नसून शिवशाहीची बससेवा अर्धा तासाच्या अंतराने सुरु असल्याने प्रवाशांत नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण शिवशाहीचा तिकीट दर ज्यादा असून ती नियमित प्रवास करणार्‍यांना परवडत नसल्याची खंत या निवेदनाव्दारे प्रवाशांनी व्यक्त केली. 
अलिबाग-पनवेल आगाराच्या 24 फेर्‍या या शिवशाही बसच्या जास्त प्रमाणात केल्या जात आहेत. त्याचप्रमाणे अचानक पनवेल आगाराने शिवशाही बस सेवा सुरु केल्या आहेत. त्याचबरोबरीत अलिबाग आगारानेही सध्या एसटी बस कमी करुन शिवशाही बस सुरु केल्या आहेत. तसेच नियमित प्रवाशांचे त्रैमासिक पास असल्याने ते शिवशाही बसला चालत नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्टया प्रवाशांचे नुकसान होते. त्याचप्रमाणे साध्या बसची वाट पाहण्यात वेळ वाया जावून प्रवाशांना आपल्या कार्यालयात किंवा इच्छितस्थळी पोहोचण्यात वेळ लागतो. शिवशाही बसला त्रैमासिक पासचा फरक लागू होत नाही. त्यामुळे ती सवलत लागू करण्यात यावी जेणेकरुन प्रवासी कार्यालयात घरी किंवा अन्य ठिकाणी वेळेत पोहचू शकतील. सोमवारी सकाळी अलिबाग आगारातून साध्या बस पनवेलला सोडण्यात याव्यात जेणेकरुन गर्दीमुळे मधल्या स्टॉपवर बस थांबत नसल्याने ऑफिसला जायला उशीर होतो. 
सकाळी अलिबाग आगारातून प्रामुख्याने सहा ते आठ या वेळेत नियमित प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या मोठया प्रमाणात असल्याने सदर वेळेत शक्यतो शिवशाही बस लावण्यात येवू नये अशी मागणी नियमित प्रवाशांकडून केली जात आहे. अलिबाग-पनवेल विनावाहक, एक साधी व एक शिवशाही बस अशा पध्दतीने लावावी. त्यामुळे प्रवाशांना जास्त वेळ बसची वाट बघावी लागणार नाही. शिवशाही बसमुळे साध्या बसचे प्रमाण कमी करण्यात आलेले दिसून येते. तसेच काही बसमध्ये पावसाची गळती होत असल्याचेही पहायला मिळते. संध्याकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत साधी बस उपलब्ध करुन द्यावी त्यामुळे प्रवाशांचा परतीचा प्रवास सुलभ होईल अशा मागण्या प्रवाशांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत. 
प्रवाशांच्या अडचणींचा विचार करुन पर्यवहन मंडळाला योग्य त्या सूचना द्याव्यात जेणेकरुन त्यांचा दैनंदिन प्रवास सुलभ होईल. अशी मागणी निवेदनात केली आहे. निवेदन देतेवेळी प्रवासी मतिन अजिज अधिकारी, चंद्रशेखर किशोर सोनकर, चेतन बाळकृष्ण वर्सोलकर, सागर रमेश वर्तक, संदीप हरिश्‍चंद्र चव्हाण, सुबोध कुलकर्णी आदी प्रवासी उपस्थित होते.
Comments