प्रवासी बनून चौकडीने कार चालकाला लुटले ...
प्रवासी बनून चौकडीने कार चालकाला लुटले 

पनवेल दि.०६ (वार्ताहर) : मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारमध्ये प्रवासी बनून बसलेल्या अज्ञात चौकडीने कार चालकाला मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर लुटल्याची घटना उघडकीस आली आहे. खांदेश्वर पोलिसांनी या घटनेतील अज्ञात चौकडी विरोधात जबरी लुटीचा गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे. 
कार चालक स्वप्निल कुदळे (२८) पुणे येथून एअरपोर्टचे भाडे घेऊन मुंबईत आला होता. त्यानंतर पुणे येथे जाण्यासाठी निघाला असताना खारघर येथील ब्रिजखाली चौघे लुटारू पुणे- वाकड येथे जाण्याच्या बहाण्याने त्याच्या कारमध्ये बसले. त्यानंतर स्वप्नील मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर  खालापूर येथे पोहोचल्यानंतर एका लुटारूने बहाणा करून कार थांबवायला सांगितली. पाठीमागे बसलेल्या लुटारूने स्वप्नीलचा गळा आवळला, तर दुसऱ्याने त्याचे तोंड दाबून मारहाण केली. तर तिसऱ्याने चाकूचा धाक दाखवून धमकावले. त्यानंतर त्यातील एका लुटारुने कारचा ताबा घेत विरुद्ध दिशेने पुन्हा मुंबईच्या दिशेने पनवेल येथे जाण्यास सुरुवात केली. यादरम्यान चौघांनी स्वप्नीलच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील अंगठ्या, ब्ल्यूटुथ इयर फोन जबरदस्तीने काढून घेतले. मात्र रोख रक्कम न सापडल्याने स्वप्निलकडील एटीएम कार्ड व त्याचे पासवर्ड जबरदस्तीने घेऊन एटीएम सेंटरमधून १० हजार रुपये काढून घेतले व पलायन केले.
Comments