सोनाराला घातला १ लाख २० हजार रुपयांचा गंडा ..
सोनाराला घातला १ लाख २० हजार रुपयांचा गंडा 

पनवेल दि.११ (वार्ताहर) : सोनाराला बनावट चेन विकून १ लाख २० हजार रुपयांचा गंडा घातल्याची घटना उलवे नोड मध्ये घडली आहे. 
 उलवे सेक्टर २० येथील सागर ज्वेलर्समध्ये हा प्रकार घडला आहे. कामगार अरुणकुमार जोशी हा ज्वेलर्समध्ये असताना एक अनोळखी व्यक्ती त्याठिकाणी आली होती. त्याने एका ओळखीच्या व्यक्तीचे नाव सांगून त्याच्याकडील सोन्याची चेन विकायची असल्याचे सांगितले. या वेळी शिफारस केलेले नाव परिचयाचे असल्याने जोशी याने त्या ग्राहकाकडील चेनचे मूल्य करून त्याला १ लाख २० हजार रुपये दिले होते. मात्र, दुसऱ्या दिवशी तीच व्यक्ती पुन्हा सोन्याची चेन विक्रीसाठी दुकानात आली. यामुळे जोशी याला संशय आल्याने त्याच्याकडील चेन घेऊन तपासली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. याबाबत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने ती चेन मित्राची असल्याचे सांगून चलाखीने तिथून पळ काढला. याप्रकरणी एनआरआय पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानुसार ग्राहक बनून आलेल्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
Comments