पनवेल येथे रेल्वेस्टेशन कन्सलटेटीव्ह कमिटीची बैठक संपन्न...
पनवेल / वार्ताहर : - स्टेशन कन्सलटेटीव्ह कमिटीची बैठक गुरुवार दिनांक 20 मे रोजी पनवेल रेल्वे स्टेशन येथील स्टेशन प्रबंधक जे पी मीना यांच्या दालनात संपन्न झाली. प्रवासी संघ, पनवेल चे अध्यक्ष तथा कन्सलटेटीव्ह कमिटी सदस्य डॉ. भक्ती कुमार दवे आणि झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटी चे सदस्य अभिजीत पाटील यांची या बैठकीला विशेष उपस्थिती होती.
रेल्वे प्रशासनाच्या वतीने स्टेशन मास्तर तथा स्टेशन कन्सलटेटीव्ह कमिटी चे सेक्रेटरी जे पी मीना, कमर्शियल स्टेशन मास्तर सुधीर कुमार उपस्थित होते.डॉ.भक्तीकुमार दवे यांनी प्रास्ताविक सादर केले.आगामी दोन वर्षाकरता गठीत झालेल्या या समितीची ही पहिलीच बैठक असल्याने जुन्या-नव्या सदस्यांनी एकोप्याने काम करत प्रवाशांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सहभागी झाले पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. तसेच रेल्वेच्या माध्यमातून कामे करवून घेत असताना येणारी आव्हाने,अडचणी समजावून घेणे गरजेचे आहे असे देखील ते म्हणाले.आगामी काळात येऊ घातलेल्या DFC प्रकल्पामुळे आपल्याला आपल्या आंदोलनांची आणि मार्गक्रमणाची दिशा निश्चिती करणे देखील काळाची गरज बनली असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी स्थानक परिसरातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर आला.रेल्वे,सिडको आणि पनवेल महानगरपालिका ही तीनही आस्थापने रस्त्याच्या डागडुजी करता हात वर करत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. अभिजित पाटील यांनी या विषयाबाबत अभ्यासपूर्ण माहिती मिळवून जर आस्थापने जबाबदारी स्वीकारत नसतील तर संयुक्तपणे भूमि परिक्षण करून त्या त्या आस्थापनांना अधिकार असलेल्या जागा निश्चिती करावीच लागेल अशी आग्रही भूमिका मांडली.
शौचालयातील अस्वच्छता, रिक्षांची होणारी गर्दी, वाहतुकीचा उडणारा बोजवारा, दुचाकी तसेच चारचाकी वाहनांच्या पार्किंगचा प्रश्न, कोरोना कालखंडात वाढविलेले विशेष प्रवासी शुल्क अद्यापही घेतले जात आहे ते पूर्ववत करणे, कंत्रादारांकडून प्रवाशांना होणारा त्रास,सबवे पनवेलच्या पूर्व स्थानक दिशेला उघडण्याचे काम जलद गतीने पूर्ण करणे, चिखले गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची रेल्वे पुलामुळे झालेली दुरावस्था दूर करणे, सोमाटणे रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी रस्त्याची तरतूद करणे अशा विविध समस्यांबाबत रेल्वे प्रशासनाला अवगत करण्यात आले.
बैठकीनंतर कन्सलटेटीव्ह कमिटी सदस्यांनी कमर्शियल स्टेशन मास्तर सुधीर कुमार यांच्याबरोबर संपूर्ण स्टेशन परिसरात फिरून प्रवाशांसाठी च्या सोयीसुविधा, यापूर्वी मांडलेल्या समस्यांचे निराकरण यांचा आढावा घेतला.
या बैठकीसाठी प्रवासी संघ पनवेल चे अध्यक्ष तथा कन्सलटेटीव्ह कमिटी सदस्य डॉ. भक्ती कुमार दवे आणि झोनल रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटी चे सदस्य अभिजीत पाटील,स्टेशन मास्तर तथा स्टेशन कन्सलटेटीव्ह कमिटी चे सेक्रेटरी जे पी मीना, कमर्शियल स्टेशन मास्तर सुधीर कुमार, प्रवासी संघाचे कार्यवाह आणि सबर्बन रेल्वे युजर्स कन्सलटेटीव्ह कमिटी सदस्य श्रीकांत बापट, उपाध्यक्ष यशवंत ठाकरे, सहकार्यवाह निलेश जोशी, पत्रकार मंदार मधुकर दोंदे, विलास दातार, मधुकर आपटे, रमेश जानोरकर, संतोष पाटील,सुनील रानडे, सरिता पाटणकर,माजी स्टेशन मास्तर डी के गुप्ता,गौतम अगरवाल आदी मान्यवर उपस्थित होते.
चौकट
पनवेल रेल्वेस्थानक परिसरात होत असलेले सकारात्मक बदल
१) उपनगरीय रेल्वे फलाट आणि बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचे फलाट येथील तिकीट खिडक्यांवर दोन्ही ठिकाणची तिकिटे उपलब्ध झाली आहेत.
२) बाहेरगावी जाणाऱ्या गाड्यांच्या स्थानकावर फलाट क्रमांक पाच व सहा येथे लिफ्टची सोय उपलब्ध होणार आहे.
3) DCF या महत्त्वपूर्ण प्रकल्पाच्या कामास पुढच्या पाच ते सहा महिन्यात सुरुवात होणार आहे.