यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नॅककडून 'अ' श्रेणी दर्जा...
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नॅककडून 'अ' श्रेणी दर्जा...


पनवेल दि.१३ (वार्ताहर) : मुक्त शिक्षणासाठी देशातील अग्रगण्य विद्यापीठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नॅक अर्थात राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेकडून 'अ' श्रेणीचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. देशात २०१९ पासून दूरस्थ शिक्षण देणाऱ्या विद्यापीठांच्या नॅक मूल्यांकनाला सुरवात झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाला नॅककडून पहिल्याच फेरीत 'अ' श्रेणीसह मानांकन प्राप्त झाल्याने आनंद व्यक्त होत आहे. याबाबतची अधिकृत घोषणा कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात केली. कार्यक्रमास अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. सूर्या गुंजाळ, अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे संचालक डॉ. हेमंत राजगुरू उपस्थित होते.
या मानांकनामुळे मुक्त विद्यापीठाने आपले 'ज्ञानगंगा घरोघरी' हे ब्रीद सार्थ ठरले असून, 'सर्वांसाठी शिक्षण' या तत्वाची उत्तम अंमलबजावणी केल्यावरून राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषदेने विद्यापीठाचे कौतुक केले आहे. आठ सदस्यांचा समावेश असलेल्या नॅक पीअर टीमने दिनांक ६ ते ८ एप्रिल दरम्यान विद्यापीठ मुख्यालयास भेट देवून गुणवत्तेच्या निकषांची पाहणी केली. नॅक समितीने विद्यापीठातील भौतिक, माहिती व तंत्रज्ञानाधिष्ठिति पायाभूत सुविधा व अध्ययनाचे स्त्रोत यासाठी चार पॉईंट स्केलवर सर्वाधिक म्हणजे ३.४५ गुण मिळाले. त्या पाठोपाठ विद्यार्थी सहाय्यता व प्रगती याकरिता ३.४ तर संस्थात्मक मूल्ये व उत्तम उपक्रमांसाठी ३.३५ गुणांक मिळाले. अ वर्ग मानांकनामुळे युजीसी व केंद्र सरकारकडून तसेच रूसासारख्या संस्थांकडून विद्यापीठ भरीव अनुदानास पात्र होण्यासोबतच एनआयआरएफ संस्थेकडे राष्ट्रीय मानांकनासाठी मुक्त विद्यापीठाला अर्जही करता येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी दिली. नॅक टीमने विद्यापीठाची ऑनलाईन प्रवेश प्रणालीचे तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या उत्तर पुस्तिका स्कॅनींग व प्रॉक्टर पद्धतीने आयोजित केलेल्या ऑनलाईन परीक्षेबद्दल कौतुक केले. कृषी विज्ञान केंद्राच्या विविध विस्तार उपक्रमांनी नॅक टीम प्रभावित झाली. तंत्रज्ञानावर आधारित पायाभूत सुविधा व त्यांचा दर्जेदार उपयोग याबद्दलही नॅक टीमने समाधान व्यक्त केले. ग्रंथालय इमारतीच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेबद्दल व उपयुक्ततेबाबत समाधान व्यक्त करून संदर्भ व माहितीच्या स्त्रोताबद्दल जाणून घेतले. विद्यापीठाचा हरित परिसर, नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघटना, दृकश्राव्य केंद्र यासह विविध उपक्रम नॅक टीमला प्रभावित करणारे ठरले.
पहिल्या टप्प्याअंतर्गत नविन निकषानुसार विद्यापीठाने स्वयंमूल्यनिर्धारण संख्यात्मक अहवाल सादर केला. या विविध निकषांमध्ये अभ्यासक्रम, अध्ययन-अध्यापन प्रणाली, संशोधन, नवनिर्मिती व विस्तार, पायाभूत सुविधा आणि अध्ययन स्रोत, प्रशासन, नेतृत्व व व्यवस्थापन आणि संस्थात्मक मूल्ये व उत्तम उपक्रमांचा समावेश होतो. दुसऱ्या गुणात्मक टप्प्यांतर्गत विद्यार्थी समाधान सर्वेक्षण आणि माहितीची विधिग्राहयता व पडताळणीची प्रक्रिया पार पडली. यामध्ये संख्यात्मक माहितीवर आधारित ऑनलाईन प्रक्रिया तर गुणात्मक माहितीसाठी पीआर टीमची प्रत्यक्ष भेट अशा स्वरूपात मूल्यांकन केले गेले. या कालावधीत नॅक सदस्यांनी विद्यापीठाच्या सर्व विभागांना भेटी दिल्या. तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी जी पाटील, कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे, अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे प्रमुख डॉ. सूर्या गुंजाळ, परीक्षा नियंत्रक बी. पी. पाटील, अंतर्गत गुणवत्ता केंद्राचे संचालक डॉ. हेमंत राजगुरू यांच्यासह विविध विद्या शाखांचे संचालक, प्राध्यापक, वित्त व लेखा अधिकारी, संशोधक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्याशी संवाद साधला. विद्यापीठाची सामाजिक कार्ये, जोपासलेली मूल्ये, विद्यार्थ्यांसाठी सुलभ कार्यप्रणाली विद्यार्थी विकास अशा अनेक बाबतीत विद्यापीठाने संख्यात्मक आणि गुणात्मक अशा निकषांवर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. माजी कुलगुरू प्रा. ई वायूनंदन यांच्या कालावधीत नॅकची तयारी करण्यात आली होती तर विद्यमान कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठाने नॅक समितीसमोर सादरीकरण केले.

चौकट : विद्यापीठाच्या वाटचालीतील महत्वाचा टप्पा कुलगुरू डॉ. पाटील -
विद्यापीठाच्या ३२ वर्षांच्या वाटचालीतील हा एक महत्वाचा टप्पा आहे. विद्यापीठाला मिळालेल्या या श्रेणीचा फायदा हा विद्यापीठ आणि सर्व संबंधित घटकांना होईल. या प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यापीठातील सर्व अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि विविध विभागीय केंद्र व अभ्यास केंद्रांचे विशेष अभिनंदन करतो.
Comments