जातीय दंगली असो वा कोरोना काळ यामध्ये सर्वधर्म समभाव एकत्रित असल्याचे प्रतिक नवी मुंबईत दिसून आले ; पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे
जातीय दंगली असो वा कोरोना काळ यामध्ये सर्वधर्म समभाव एकत्रित असल्याचे प्रतिक नवी मुंबईत दिसून आले ; पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे
पनवेल, दि.10 (संजय कदम) ः 1993 सालच्या जातीय दंगली असो किंवा 2 वर्षापासून सुरू असलेला कोरोना काळ असो, या काळात माणसांनी माणसांशी कसे जगावे याची शिकवण सगळ्यांना मिळाली. सर्वांनी आपली जात, धर्म, पंथ विसरुन एकमेकांना मदतीचा हात दिला व संपूर्ण देशामध्ये एक वेगळे चित्र दिसून आले. याचा हेवा परदेशी देशांना होत आहे की भारत देश हा एकसंघ आहे. हेच वातावरण नवी मुंबई परिसरात असल्याने एक सलोख्याचे चित्र प्रत्येक वेळी दिसून येत असल्याने यासाठी समाजाचे देणे लागतो या भावनेतून काम करणार्‍या व्यक्तींचा सन्मान आज पोलीस आयुक्तालय नवी मुंबई स्वतंत्र भारताचा 75 वा अमृत महोत्सवांतर्गत आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह पनवेल येथे संपन्न होत असून या कार्यक्रमामधून एक सामाजिक बांधिलकीचा संदेश सर्वत्र जात असल्याचे प्रतिपादन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे, परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहा.पोलीस आयुक्त भागवत सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते बाबा आलम, मौलाना मुफ्ती मामुन रशीद, मा.नगराध्यक्ष सईद मुल्ला, सामाजिक कार्यकर्त्या माधुरी गोसावी, मानसी पाटील, फादर पॉल आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राथमिक स्वरुपात कोविड काळात समाजासाठी अहोरात्र झटणार्‍या व्यक्तींचा प्रशस्तीपत्रक व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना सुरेश मेंगडे यांनी सांगितले की, मानवता हाच मुख्य धर्म असून माणसाने माणसाच्या मदतीला धावले पाहिजे. कोरोनाच्या काळामध्ये अनेक जण घरी बसून होते. यावेळी फक्त पोलीस हाच रस्त्यावर होता. अनेक ज्येष्ठ नागरिकांना गेल्या दोन वर्षापासून मदत करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. 
सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी वेगळी हेल्पलाईन सुरू करण्यात आली असून तेथे संपर्क साधल्यास तात्काळ जवळील पोलीस ठाण्याचे पथक त्यांच्या मदतीला धाव घेते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नवी मुंबई हे एक नंबरला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आगामी पिढीकडे पाहताना आपण त्यांच्या व्यसनांकडे सुद्धा लक्ष घालणे जरुरीचे आहे. प्रत्येकांनी जागरुक राहून आपल्या परिसरात अनुचित प्रकार घडत असतील तर त्याची तात्काळ माहिती संबंधित पोलीस ठाण्याला देणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे माता-भगिनी यांनी सुद्धा आपल्या कुटुंबासाठी केलेल्या कामाचे त्यांनी कौतुक केले. नवी मुंबई परिसर हा व्यसनमुक्ती करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत. लवकरच नवी मुंबई हा गुटखा व ड्रग्स मुक्त परिसर असेल असेही त्यांनी यावेळी सांगितले. सदर कार्यक्रमाचे नियोजन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वपोनि विजय कादबाने व त्यांच्या सहकार्‍यांनी केल्याबद्दल विशेष कौतुक यावेळी उपस्थित अधिकार्‍यांनी केले.


फोटो ः दिप प्रज्वलन करताना पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे व सहकारी
Comments