नागरिकांच्या मागणीनुसार ऑनलाईन मालमत्ता उतारा मिळणार विनाशुल्क..


नागरिकांच्या मागणीनुसार ऑनलाईन मालमत्ता उतारा मिळणार विनाशुल्क
पनवेल,/ दि१३ : महापालिकेच्या मालमत्ता कर विभागासाठी नव्याने विकसीत केलेल्या संगणक प्रणालीद्वारे काढण्यात येणारा ऑनलाईन मालमत्ता उतारा हा आता विनाशुल्क मिळणार आहे. मागील स्थायी समितीमध्ये या विषयास सर्व सदस्यांनी मंजूरी दिली आहे.
      ऑनलाईन मालमत्ता उतारा विनाशुल्क मिळावा अशी नागरिकांची वारंवार मागणी होत असल्याने ,महापालिकेने हा उतारा विनाशुल्क देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मालमत्ता धारकांनी प्रत्यक्ष मालमत्ता विभागातून मालमत्ता उतारा घेतल्यास त्यांना विहीत केलेली प्रती उतारा १०० रुपये फी द्यावी लागणार आहे. तसेच ऑनलाईन उतारा घेण्यासाठी मालमत्ता धारकांनी आपला संपुर्ण मालमत्ता कर भरणा करणे आवश्यक असून त्यानंतरच वेबसाइटवरून विनाशुल्क उतारा डाऊनलोड करता येणार आहे.
     पनवेल महानगरपालिकेमार्फत मालमत्ता धारकांना ई सुविधा देण्याकरिता तसेच नागरिकांच्या वेळेची बचत व्हावी , घरबसल्या आपल्या मालमत्ता करासंबंधित तसेच नोंदणीकृत मालमत्तेबाबत संपूर्ण माहिती  देण्याच्या हेतुने ‘ मनपा आपल्या दारी’  हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत ‘PMC TAX APP’ मोबाईल ॲप विकसित करण्यात आले आहे. या ॲपच्या माध्यमातून ई गव्हर्नन्सच्या दृष्टीने पालिकेने महत्वाचे पाऊल टाकले आहे. आत्तापर्यंत ४ हजार ५५९ नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करून घेतले आहे. या ॲपच्या माध्यमातून आजपर्यंत  २४ लाख ४९ हजार ७१५ एवढा मालमत्ता कर भरला आहे. अनेक नागरिकांनी या ॲपमधील विविध सुविधेचा लाभ घेतला आहे तसेच या ॲप बद्दल समाधान व्यक्त केले आहे.
     ३१ मार्च २०२२ पर्यंत मालमत्ता करांवरती ५ टक्के सूट देण्यात आली आहे. नागरिकांनी या सवलतीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले आहे.
 
     चौकट
नागरिकांना मालमत्ता करासंदर्भात माहितीसाठी वारंवार पालिकेत ये जा करावी लागू नये यासाठी महापालिकेने ४०टॅब आपल्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत. या टॅबच्या माध्यमातून कर्मचारी घरोघरी जाऊन मालमत्ता कराचे बिल, टॅक्सीची माहिती, उतारा, मालमत्तेविषयीची माहिती देत आहेत. यासाठी 'क्लार्क ईपीके' हे साॅफ्टवेअर पालिकेने विकसित केले आहे.
Comments