जागतिक महिला दिन पनवेलमध्ये अनोख्या पद्धतीने साजरा..

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेची महिलांना नाट्य मेजवानी
पनवेल / प्रतिनिधी : -  जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  5 मार्च 2022 रोजी पनवेल येथील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात कार्यक्रम ठेवण्यात आला होता. या कार्यक्रमाचे आयोजन जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या सौ.ममताताई प्रीतम म्हात्रे यांच्या वतीने करण्यात आले होते. या कार्यक्रमात हजारो महिलांनी सहभाग घेतला.
याप्रसंगी बोलताना सौ ममताताई प्रीतम म्हात्रे म्हणाल्या, जागतिक महिला दिनानिमित्त सर्व घटकांतील महिलांना सोबत घेऊन  सर्वसमावेशक कार्यक्रम करण्याचे आमच्या जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या महिला पदाधिकार्‍यांनी ठरविले होते. "स्वतःसाठी काही क्षण मनोरंजनाचे" या वाक्यानुसार आम्ही आज महिलांच्या तीन पिढ्या म्हणजेच "आज्जी,आई आणि मुलगी" यांच्या मधील रोज घडणाऱ्या  काही घटना  ज्या महिला ज्येष्ठ कलाकार वंदना गुप्ते ,प्रतीक्षा लोणकर, दीप्ती लेले यांनी  "हरवलेल्या पत्त्यांचा बंगला" यात नाट्य स्वरूपात मांडलेल्या नाटकाच्या प्रयोगाचे आम्ही आयोजन केले होते. 
महिलांचा प्रतिसाद पाहून आसन व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे आम्ही या नाट्य प्रयोगाचा दुसरा प्रयोग एकाच दिवशी आयोजित केला. दोन्ही नाट्यप्रयोगाला हजारो महिलांनी उपस्थिती दाखवली. आपल्या पनवेल मधील महिला स्वच्छता दूत, मोची काम करणाऱ्या भगिनी,भाजी विकणाऱ्या मावशी, दूध विक्रेता ताई, माझ्या आबोली रिक्षा चालवणाऱ्या सर्व भगिनी, डॉक्टर,आर्किटेक्ट,पोलीस , स्वयंसेवी संस्था चालविणाऱ्या महिला पदाधिकारी अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रात बिनधास्तपणे वावरत आपलं कर्तव्य बजावणाऱ्या  या सर्वांनी उपस्थित राहून  आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली.
      
यावेळी या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्यातर्फे नाट्य प्रयोगाच्या निमित्ताने पनवेल मध्ये उपस्थित राहिलेल्या सर्व कलाकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले, आमच्या विनंतीला मान देऊन  आज पनवेल मधील सर्व क्षेत्रातील महिला येथे आल्या आहेत. हाच माझा  महिलांच्या वतीने महिला दिनानिमित्त आम्हाला मिळालेला मोठा सन्मान आहे असे मी समजतो. यापुढेही कुठल्याही प्रकारचे सहकार्य लागल्यास माझी जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था आपल्या सोबत खंबीरपणे उभी राहील.
Comments