विविध रंगांसह पिचकारींनी पनवेल परिसरातील बाजारपेठा सजल्या..
विविध रंगांसह पिचकारींनी पनवेल परिसरातील बाजारपेठा सजल्या 

पनवेल, दि.12 (वार्ताहर) ः अवघ्या काही दिवसांवर आलेल्या होळीसाठी पनवेेल परिसरासह इतर ठिकाणच्या बाजारपेठा या आता विविध प्रकारच्या रंगाने त्याचप्रमाणे विविध आकाराच्या पिचकार्‍यांनी भरल्या असून यात नैसर्गिक रंगाला चांगलीच मागणी आहे.
सध्या बाजारपेठेत यंदाच्या होळीच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याने बाजारपेठेत उत्साह आहे. विशेषकरून आपल्या आईवडीलांसमवेत बाजारात येणार्‍या बच्चे कंपनीकडून रंगपंचमीचे साहित्य खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. दरम्यान, येत्या काही दिवसात ग्राहकांच्या गर्दीमध्ये अजून वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. भारतीय परंपरेत महत्त्वाचा समजला जाणारा होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पनवेल परिसर हे येथील स्थानिक आगरी कोळ्ी भूमिपुत्रांचे शहर असल्याने होळीचा सण पारंपारिक पध्दतीने येथील भूमिपुत्रांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यानिमित्त शहर व गावठाण भागात होळी पेटवत त्याभोवती प्रदक्षिणा मारत प्रार्थना केली जाते. होळीच्या खरेदीसाठी शहरातील प्रमुख बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात. परंतु, मागील दोन वर्ष कोरोनाच्या सावटामुळे अन्य सणांप्रमाणेच या सणालाही मर्यादा आल्या होत्या. मात्र आता हे सावट दूर झाले असून होळीच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील वर्षीपेक्षा यंदा खरेदीसाठी येणार्‍या ग्राहकांची संख्याही वाढली असल्याचे सांगण्यात येते. होळीनंतर येणारे धूलिवंदन हे दोन दिवस रंगाची उधळण करीत नागरिक रंग खेळण्याचा आनंद घेतात. या दिवसांची तयारी करण्यासाठी बाजारामध्ये रंगाची खरेदी करण्यात ग्राहक मग्न आहेत. ग्राहकांची पसंती कोरड्या व नैसर्गिक रंगांना जास्त आहे. रंग उडवण्याची पिचकारी खरेदी करण्यासही चांगला प्रतिसाद आहे.

फोटो ः सजलेल्या बाजारपेठा
Comments