साहित्य प्रतिभेचे प्रतिबिंब असलेला 'ओंजळीतील शब्दफुले ' काव्यसंग्रह - साहित्यिक उत्तम कांबळे..
साहित्य प्रतिभेचे प्रतिबिंब असलेला 'ओंजळीतील शब्दफुले ' काव्यसंग्रह - साहित्यिक उत्तम कांबळे
        
पनवेल -  मराठी साहित्यातील प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकार प्रकाशित करण्याची प्रथा बंद पडत असताना कोमसापने 'ओंजळीतील शब्दफुले ' हा प्रातिनिधिक काव्यसंग्रह वेगवेगळे कवी, विषय आणि वेगवेगळ्या कविता असणारे पुस्तक प्रकाशित केले,यात केवळ कविता बद्ध झाल्या नाहीत तर कोकणातल्या साहित्य संस्कृतीचे दर्शन होते , कोकणात बहरत असलेल्या साहित्य प्रतिभेचे ते प्रतिबिंबच आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक,अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष उत्तम कांबळे यांनी पनवेल येथे व्यक्त केले.
         कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी संपादन केलेल्या  ओंजळीतील शब्दफुले या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
           या प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा पनवेलच्या श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ सभागृह येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनंसपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी.पाटील,ज्येष्ठ गझलकार ए.के.शेख, कोमसापच्या रायगड जिल्हा माजी अध्यक्षा सुनिता जोशी, रायगड जिल्हा कोमसापचे संजय गुंजाळ, सुखद राणे, अ‍ॅड. गोपाळ शेळके, सुधाकर चव्हाण, कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी उपस्थित होते.
    यापुढे बोलताना उत्तम कांबळे म्हणाले, कविता ही एक विलक्षण गोष्ट आहे.प्रातिनिधिक काव्यसंग्रहातून कवींचे अनेक पैलू भेटत असतात. प्रातिनिधिक काव्यसंग्रहामुळे कवी, वाचकांना फायदा होतो.शोधाच्या प्रक्रियेत साहित्य जन्माला येते. प्रत्येक कलावंतांची कला ही त्याच्या रियाजावर फुलते म्हणून कवितेवर रियाज करा. तुम्ही तुमच्या कवितेचे समीक्षक बना. साहित्याचे प्रयोजन माहीत करुन घ्या,त्यातून उत्तम साहित्य कलाकृती तयार होते. प्रतिभा आणि वेदना यांच संगम म्हणजे साहित्य असत.जगण्याला कवितेचे नाव द्या.ज्याच्याकडे व्यक्त होण्याची आस आहे असाच माणूस लिहू शकतो. दारे-खिडक्या बंद करून कविता लिहिणाऱ्यांना कधीच पंख फुटत नाहीत. नव्या जगातील कवी आहेत पण जागतिकीकरणामध्ये मराठी साहित्य कमी पडत असल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखवली.
            कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख रायगडभूषण प्रा.एल.बी
पाटील यांनी, या काव्यसंग्रहात साहित्यिकांनी शब्दांची ओंजळ भरली आहे, त्याचा सुगंध सर्वत्र दरवळेल. कवींचे विचार आणि भक्तीची फुले आहेत. सुंदर वर्णन केलेल्या प्रभावी कविता या काव्यसंग्रहात असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठ गझलकार ए.के. शेख यांनी, रायगडमधील कवींना प्रातिनिधिक काव्यसंग्रहाच्या पुस्तकरुपाने एका व्यासपीठावर आणण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगितले.
      कोकण मराठी साहित्य परिषद नवीन पनवेल शाखेचे अध्यक्ष गणेश कोळी यांनी आपल्या प्रास्ताविकात, ओंजळीतील शब्दफुले या प्रातिनिधिक काव्यसंग्रहामध्ये विविध विषयांना स्पर्श करणाऱ्या कविता आपल्याला अंतर्मुख करतात, चिंतन करण्यास भाग पाडतात. सामाजिक अस्वस्थता,बोलीभाषा नातेसंबंध, सीमेवर लढणारा जवान,शेतकरी यांच्या मनातील भावभावनांचे पडसाद या कविता संग्रहामध्ये पहावयास मिळतात असे सांगितले.
               या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांची  तसेच रायगडमधील कवी आणि साहित्यिक यांच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. रायगड जिल्हा कोकण मराठी साहित्य परिषदेच्या नवनिर्वाचित शाखा अध्यक्ष तसेच नवीन पनवेल शाखेच्या नूतन कार्यकारिणीचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आला.
           शाखेचे सदस्य विलास पुंडले यांची रायगड जिल्हा भारतीय किसान संघाच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिनी वैदू यांनी केले तर आभार रामदास गायधने यांनी मानले.
Comments