४० वर्षापूर्वीच्या मैत्रीचे गुंफले गेले बंध, फेसबुकने विखुरलेल्या मित्रांना केले एकत्र..
४० वर्षापूर्वीच्या मैत्रीचे गुंफले गेले बंध फेसबुकने विखुरलेल्या मित्रांना केले एकत्र

कळंबोली (दीपक घोसाळकर) : बालपणीचे मित्र मैत्रिणी ते ही ४० वर्षांपूर्वीचे , त्यांचे संमेलन होणे एक अद्भुत व अनाकलनीय गोष्ट.  मात्र  २१ साव्या शतकातील फेसबूक, व्हॉट्सऍप, सोशल मीडियाच्या माध्यमातून पालीतील ग.बा.वडेर हायस्कूलमध्ये सन १९८२-८३ मध्ये दहावीचे विद्यार्थी तब्बल चाळीस वर्षांनी आपल्या मैत्रीच्या बंधनाने अलिबाग येथे एकत्र आले आणि त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या सर्व बालपणीच्या मित्र-मैत्रिणींना अलिबागमधील ज्येष्ठ विधितज्ञ संतोष म्हात्रे यांनी त्यांच्या निसर्गरम्य फार्म हाऊस वर एकत्र आणून बालपणीच्या आठवणींना चांगलाच उजाळा देऊन पुन्हा बालपण सर्वांमध्ये जाग केले.
          मैत्रीचा धागा जोपासून मैत्रीचे बंध टिकवण्यासाठी विविध प्रकारचे डे साजरे केले जातात व त्यातून मैत्रीचा ओलावा निर्माण केला जातो.सुधागड तालुक्यातील पाली येथील गणेश बाळकृष्ण वडेर हायस्कूल मध्ये सन १९८२- ८३  मध्ये इयत्ता दहावीच्या वर्गात शिक्षण घेतलेले अन् आता राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात स्थिरावलेल्या मित्रांना पुन्हा मैत्रीची साथ देण्यात आली. यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून मित्र-मैत्रिणींना एकत्र आणण्याचे काम करण्यात आले. 
मराठी राजभाषा दिनानिमित्त अलिबाग येथील बेलकडे मधील निसर्गरम्य वातावरणात असलेल्या ऍड.संतोष म्हात्रे यांच्या फार्म हाऊस मध्ये राज्यातील काना कोपऱ्यातून बालपणीचे मित्र एकत्र आले. संमेलनाच्या प्रारंभीचा काळामध्ये कोरोनामुळे हकनाक दुरावलेल्या मित्र मैत्रिणी ,त्यांचे नातेवाईक डॉक्टर, पोलीस, सैन्य दलातील शिपाई ,सामाजिक कार्यकर्ते यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर दोन वर्षाचा या कालावधीत अनुभवास आलेले काही कटू गोड अनुभव उपस्थित असलेल्या सर्व मित्र-मैत्रिणींनी एकमेकांना सांगून मनसोक्त गप्पा मारल्या. त्यानंतर चाळीस वर्षांपूर्वी किंवा त्याही अगोदर शालेय जीवनामधील घडलेल्या विविध गमतीजमती, एकमेकांनी केलेल्या खोड्या , शिक्षकांबाबत केलेल्या चेष्टामस्करी, शिक्षकांनी कशाप्रकारे केलेल्या शिक्षा, कोण हुशार कोण ढ त्याबद्दल विविध अनुभव उपस्थित मित्रांनी सांगून शालेय जीवनातील स्मृतींना पुन्हा जिवंत करून उजाळा देण्यात आला. तसेच  विविध गाणी बहारदार गीतसंगीत गाऊन सम्मेलाना चार चाँद लावले. यामध्ये  ऍड.संतोष म्हात्रे यांनी जाने कहा गये वो दिन , दिपक घोसाळकर यांनी क्या हुआ तेरा वादा ,तर मिर्झा पानसरे यांनी हसले रे मन माझे हे गीत गाऊन सर्वांना सुखद आनंद दिला. दुपारच्या वेळेस पुरण पोळीचे स्वादिष्ट पूर्ण शाकाहारी भोजनाचा आनंद उपस्थित मित्रांनी घेऊन कार्यक्रमाचे आयोजक संतोष म्हात्रे यांना खूप खूप धन्यवाद दिले. अनेक वर्षांनी भेटलेल्या मित्र-मैत्रिणींना प्रमिला थले, सुजाता दाभोळकर यांनी मैत्रिची भेट वस्तू दिली. संमेलनाच्या समारोपाच्या वेळी संमेलनाचे आयोजक  संतोष म्हात्रे यांच्या सुविद्य पत्नी अलिबागचा उपनगराध्यक्ष व जेष्ठ विधि तज्ञ ऍड.मानसी ताई म्हात्रे या उपस्थित राहिल्या होत्या .त्या उभयतांचे संमेलनाला उपस्थित असलेल्या  मित्रांनी स्वागत  केले .यावेळी मानसी ताई म्हात्रे यांनी खूप मोलाचे मार्गदर्शन करून कुटुंब व्यवस्था आनंदित ठेवण्यासाठी असलेल्या बहुमोल टिप्सही दिल्या व आगामी काळातही असेच आपण सर्व एकत्र येऊया असे सांगून मित्र मैत्रिणी हा प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले . आगामी स्नेहसंमेलन ज्या विद्यालयाच्या मातीत आपण सर्वजण घडलो त्या विद्यालय तच आगामी स्नेहसंमेलन करून आपल्या ज्या वर्गात शिकलो त्या वर्गात बसून संमेलन करण्याची घोषणा रविकांत घोसाळकर यांनी केल्याने सर्व मित्रांनी आनंद व्यक्त केला.सदरचे संमेलन यशस्वी करण्यासाठी पालीतील रविकांत घोसाळकर ,दीपक दंत,दीपक थळे ,सुबोध पागे तर पनवेलमधील विजय जंगम, विनायक सातूर्डेकर, विलास सोनवणे, रेखा मपारा, शुभदा दुर्वे यांनी मोलाची कामगिरी बजावली .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक घोसाळकर यांनी केले.
Comments