कबड्डी महाराष्ट्राचा श्वास तर रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण - आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल (प्रतिनिधी) महाराष्ट्राच्या मातीत रुजलेली कबड्डी महाराष्ट्राचा श्वास असून रायगड जिल्हा कबड्डीपटूंची खाण आहे, असे प्रतिपादन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज उलवेनोड येथे केले.
गोरगरिबांचे आधारस्तंभ दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवस वर्ष निमित्ताने श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल आणि रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने उलवेनोड मधील रामशेठ ठाकूर मैदानावर दिनांक २० ते २२ फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आलेल्या रायगड जिल्हास्तरीय प्रौढ महिला आणि पुरुष गट जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी २०२६ स्पर्धेचा उदघाटन सोहळा आज (दि. २०) लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार महेश बालदी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी प्रमुख संयोजक म्हणून ते बोलत होते.
उलवे नोडमधील सेक्टर १२ येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल जवळील रामशेठ ठाकूर मैदानावर सुरु झालेल्या या स्पर्धेच्या उदघाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष ज्येष्ठ नेते जे. एम. म्हात्रे, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे माजी सरकार्यवाह ऍड. आस्वाद पाटील, पनवेल महानगरपालिकेच्या उपमहापौर प्रमिला पाटील, ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे सचिव परेश ठाकूर, उपाध्यक्ष अरुणशेठ भगत, स्पर्धा संयोजन समितीचे सचिव शरद कदम, श्री. शिव छत्रपती पुरस्कार विजेते प्रमोद म्हात्रे, श्री. शिव छत्रपती पुरस्कार विजेते सुर्यकांत ठाकूर, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी सहकार्यवाह जे. जे. पाटील, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, भाजपचे माजी शहराध्यक्ष अनिल भगत, ज्येष्ठ नेते जयंत पगडे, रवीशेठ पाटील, पंचायत समिती सदस्य वितेश पाटील, जिज्ञासा कोळी, माजी पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत, कामगार आघाडीचे प्रदेश सचिव संजय भगत, कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष हिराचंद्र पाटील, खजिनदार जगदीश पाटील, प्रथमेश पाटील, संजय मोकल, नरेश म्हात्रे, प्रफुल्ल पाटील, जनार्दन पाटील, अजिंक्य पाटील, वाहतूक सेनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रभुदास भोईर, न्हावे सरपंच विजेंद्र परील, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, भार्गव ठाकूर, रविनाथ पाटील, जयवंत देशमुख, अनंता ठाकूर, अंकुश ठाकूर, योगिता भगत, मिनाक्षी पाटील, निलेश खारकर, यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवर तसेच कबड्डीप्रेमी मोठ्या संख्यने उपस्थित होते. या स्पर्धेच्या प्रारंभाला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्री प्रतिमांचे पूजन झाले. त्यानंतर लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते क्रीडाध्वजाचे रोहण करण्यात झाले तर आमदार महेश बालदी यांच्या हस्ते क्रीडाज्योती प्रज्वलित करून स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या भाषणात पुढे बोलताना म्हंटले की, रायगड जिल्ह्यात अनेक शिवछत्रपती पुरस्कार विजेते घडले आहेत. त्यांच्या पाऊलावर पाऊल टाऊन अधिकाधिक प्रतिभावंत खेळाडू घडत आहेत. काल शिवजयंती निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना संपूर्ण जगाने अभिवादन केले. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली हि भूमी आहे. रायगड जिल्ह्याने या खेळावर सातत्याने प्रेम केले आहे. पेण, अलिबाग आणि त्या परिसरातील भागात मोठ्या प्रमाणात या खेळाचे आयोजन केले जाते. पनवेलच्या भागात तेवढ्याप्रमाणात रुजली नसली तरी प्रो कबड्डीच्या माध्यमातून कबड्डी पोहोचली आहे. अटलसेतू या भागाला जोडलेला आहे त्याचबरोबर नागरीकरणही वाढले आहे त्यामुळे आगामी काळात खेळाडूंची संख्या वाढणार आहे, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. यावेळी त्यांनी ज्येष्ठ खेळाडूंच्या योगदानाबद्दल आभार व्यक्त करून नवोदित खेळाडूंचे स्वागत करत यांच्यातून उद्याचे उत्तम खेळाडू नेतृत्व करणार आहेत, असे अधोरेखित केले. कबड्डी चळवळीला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ कब्बडीपटू कार्यरत असून त्यांच्या प्रेरणेने जिल्ह्यातून शिवछत्रपती पुरस्कार विजेते, अर्जुनवीर खेळाडू निर्माण होतील अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त करून या स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी दिल्याबद्दल कबड्डी असोसिएशनचे आभार मानले.
आगामी राज्यस्तरीय स्पर्धेच्या धर्तीवर जिल्ह्याचा संघ निवड करण्याच्या दृष्टीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत जिल्ह्यातील १२८ पुरुष कबड्डी संघ आणि ३२ महिला संघ सहभागी झाले आहेत. यातून निवड झालेल्या खेळाडूंचा संघ महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाच्या राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये रायगडचे प्रतिनिधित्व करणार आहे. या स्पर्धेच्या अनुषंगाने जवळपास १०० पंच कार्यरत असून सुसज्ज अशी चार क्रीडांगणे, मुख्य स्टेज, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, प्रथमोपचार केंद्र, नाश्ता, भोजन, तसेच इतर पूरक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.