कुत्र्याला चिरडल्याप्रकरणी कार चालकावर कामोठ्यात गुन्हा दाखल..
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः कामोठे से-19 येथील एका सोसायटीसमोरील मैदानात झोपलेल्या भटक्या कुत्र्याला कारखाली चिरडल्याप्रकरणी कारचालकाविरुद्ध कामोठे पोलिस ठाण्यात भादंवि कलम 428 व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, 1960 चे कलम 11(1)(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत हकीकत अशी की, कामोठे से-19 मधील साईदर्शन सोसायटीत राहणारी प्रणाली वाघमारे, नावाची तरुणी दुपारच्या सुमारास घरातील बाल्कनीमध्ये बसलेली असतांना समोरील बाजुच्या ग्रांउडवर एक वेगॅन कार क्र (एमएच 03/बीसी 6314) वळण घेत असताना तेथे झोपलेल्या कुत्र्याला चिरडण्याचा प्रकार घडला होता. या घटनेत जखमी कुत्र्याला जवळच्या प्राण्यांचे हाँस्पिटलमध्ये उपचारासाठी घेवून चला असे सदर तरूणीने कारमधील व्यक्तींना सांगितले. मात्र त्यांनी याबाबत टाळाटाळ करत पळ काढला. दरम्यान, यानंतर सदर तरूणीने प्राण्यांचे संबंधीत काम करणार्या भुमी जीव दया संवर्धन ट्रस्ट तुर्भे या संस्थेला या प्रकाराची माहिती देत अपघातातील जखमी कुत्र्याला उपचारासाठी आयडीए, देवनार येथील हाँस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र तेथील 8 दिवसांच्या उपचारानंतर सदर कुत्र्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी सदर तरुणीने कुत्र्याला चिरडणार्या कारचालकाविरोधात कामोठे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी वेगनकार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहे.