रसिकहो संस्थेच्या वतीने काव्य सुमनांनी मराठी भाषा गौरव दिन साजरा..

सुप्रसिद्ध कवी,गीतकार आशिष चौबळ यांच्या पुढाकाराने झाला कार्यक्रम संपन्न

पनवेल / प्रतिनिधी
मराठी भाषा गौरव दिन हा दरवर्षी २७ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो. पनवेल च्या काव्य प्रेमींच्या "रसिकहो" या संस्थेच्या वतीने ७ कवींनी स्व रचना सादर करून मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला . ऑनलाईन पद्धतीने साजरा झालेल्या या कार्यक्रमाचा शेकडो काव्य रसिकांनी आनंद लुटला.
        सुप्रसिद्ध कवी गीतकार आशिष चौबळ यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रथितयश कवी आणि नवकवी यांची उत्कृष्ट सांगड घालत कार्यक्रमाची संरचना करण्यात आली होती. "मनातली कविता" असे शीर्षक घेऊन पनवेल परिसरातील सात कवींनी स्वरचित काव्य रसिकांसमोर सादर केली.
     आशिष चौबळ,संपदा देशपांडे,मंदार दोंदे,सानिका पत्की,अनघा गुप्ते,योगेश शृंगारपुरे, दिपाश्री गडकरी यांनी सादर केलेल्या काव्य पुष्पांना ऑनलाईन उपस्थित असणाऱ्या रसिकांनी भरभरून दाद दिली.आशिष चौबळ यांनी हृदयस्पर्शी पद्धतीने सादर केलेल्या प्रेमाच्या तीन छटा,संपदा देशपांडे यांच्या अभ्यासपूर्ण पद्धतीने विणलेल्या आशयघन रचना,मंदार दोंदे यांची विविध पद्धतीच्या काव्य सुमनांची उधळण,सानिका पत्की यांच्या भावस्पर्शी कविता,तसेच स्वर्गवासी गानकोकिळा लता मंगेशकर यांना वाहिलेली काव्य श्रद्धांजली,योगेश शृंगारपुरे यांचे खुमासदार सादरीकरण, दिपाश्री गडकरी च्या लाडिकवाळी कविता यामुळे कार्यक्रमाला विलक्षण उंची प्राप्त झाली होती.
        विशेष म्हणजे पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या सुत्रसंचालन पद्धतीला छेद देत, मनमोकळ्या गप्पा टप्पा यांच्या माध्यमातून उत्तमोत्तम काव्यरचना सादर करण्याच्या अभिनव संकल्पनेमुळे हा कार्यक्रम काव्य रसिकांच्या चिरकाल स्मरणात राहील यात जराही दुमत नाही.
Comments