शिवजयंतीचे औचित्य साधून निराधार महिलेस शिवसेना पनवेल शहर शाखेने मिळवून दिले रोजगाराचे साधन..
पनवेल / ( अनिल कुरघोडे) : - शिवसेना पनवेल शहर शाखेतर्फे निराधार महिलेस दुकान सुरू करण्यासाठी सामान भरून देऊन शिवजयंती उत्सवानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवून महिलेस रोजगार मिळवून देण्यात आला. या कार्यक्रमासाठी पनवेल शहर शाखाप्रमुख अभिजित साखरे यांनी पुढाकार घेतला होता.
सदर महिला ही नवनाथ झोपडपट्टी परिसरात राहते, तीचे पती मिलिंद सातवे यांचे निधन झाल्यामुळे परिस्थिती हालाकीची बनली होती, शाखाप्रमुख साखरे यांच्या हे लक्षात आल्याने त्यांनी शिवजन्माचे औचित्य साधून त्यांना छोटे खानी दुकानासाठी अंदाजे १५ ते २० हजार रुपयांचे सामान शिवसेना पनवेल शहर शाखेत सुपूर्द करून रोजगाराचे साधन निर्माण करुन दिले.
यावेळी बोलताना महानगर संघटक प्रथमेश सोमण यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त शिवरायांना हजारो पुष्पहार अर्पण केले जातात, अशावेळी एखादा हार कमी पडला तरी चालेल पण निराधार महिलेस रोजगार सुरू करण्यासाठी दुकानात सामान भरून देऊन शिवजयंती उत्सव साजरा करणे निश्चितच भूषणावह आहे.भविष्यात केव्हाही मदत लागल्यास शिवसेना आपल्या सोबत आहे असे ही सोमण यांनी सांगितले. यावेळी त्यांनी शाखाप्रमुख अभिजित साखरे यांचे अभिनंदन केले.
याप्रसंगी सेनेचे अच्युत मनोरे, आप्पा टेमघरे, पराग मोहिते, अनिल कुरघोडे, सुजन मुसलोंडकर, बाळा शेटे, प्रसाद सोनवणे, संतोष तळेकर, निखिल भगत, अर्जुन परदेशी, अमित माळी, गौरव सावंत, बंटी कुरघोडे, आकाश भोपतराव, भावेश शिंदे, निलेश हजारे, साहिल मोरे, कपिल कुरघोडे, स्वप्निल शिगवण, सुमित दसवते, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.