पनवेल शहरातील पाणी प्रश्‍नावरुन शिवसेना आक्रमक ; पाणी पुरवठा बंद न करण्याचा दिला इशारा..
पनवेल शहरातील पाणी प्रश्‍नावरुन शिवसेना आक्रमक ; पाणी पुरवठा बंद न करण्याचा दिला इशारा

पनवेल, दि.11 (वार्ताहर) ः पनवेल शहरात व परिसरात आठवड्यातून एक दिवस प्रभागवार पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय पनवेल महानगरपालिका प्रशासनाने घेतला असून या निर्णयाचा शिवसेनेने तीव्र विरोध करून कोणत्याही परिस्थितीत पाणी पुरवठा हा नेहमीच्या पद्धतीनेच सुरू ठेवावा अशी आक्रमक भूमिका घेतली असून याबाबतचा इशार्‍याचे निवेदन आज पनवेल महानगरपालिकेकडे देण्यात आले आहे.
शिवसेना महानगर संघटक अ‍ॅड.प्रथमेश चंद्रशेखर सोमण, शहरप्रमुख प्रवीण जाधव, युवा सेनेचे पराग मोहिते, पनवेल शहर संपर्क संघटीका रुही सुर्वे, महिला आघाडी पनवेल शहर संघटीका अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, युवा सेनेचे सनी टेमघरे, प्रसाद सोनवणे, शुभम माळी, शाखाप्रमुख अभिजीत साखरे, शैलेश जगनाडे आदींच्या पदाधिकारी व शिवसैनिकांनी यासंदर्भात पनवेल महानगरपालिकेला पत्र देवून पनवेल महानगरपालिकेद्वारे जलकुंभनिहाय आठवड्यातून एक दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सदर निर्णय हा स्थानिक वृत्तपत्रातून व रिक्षाद्वारे माहिती देवून नागरिकांना सुचित करण्यात आले आहे. याला शिवसेनेने विरोध करून पनवेल शहरातच रोजचे पाणी दिड तास मिळते तर त्याचा वेळ 15 मिनिटाने कमी करून होणारे एक दिवसाचा पाणी पुरवठा बंदचे धोरण बदलावे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पावसाचे प्रमाण चांगल्या प्रकारात झाले आहे. तरीही पनवेल शहरास पाणी पुरवठा करण्यास पालिका प्रशासन का कमी पडते आहे? हा पनवेलकरांना प्रश्‍न पडला आहे. तरी या संदर्भात एक दिवस पाणी पुरवठा बंदचा निर्णय मागे घेवून पुर्वीप्रमाणे सुरळीत पाणी पुरवठा करावा अन्यथा शिवसेना आपल्या पद्धतीने रस्त्यावर उतरेल असा इशारा शहरप्रमुख प्रवीण जाधव यांनी दिला आहे.
Comments