भूखंड हस्तांतरण होताच खारघर मधील दाऊदी बोहरा समुदायासाठी दफनभूमी
पनवेल, दि.5 (वार्ताहर) ः ‘सिडको’द्वारे खारघर मधील भूखंड पनवेल महापालिकाकडे हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. भूखंडांचे हस्तांतरण होताच खारघर मध्ये असलेल्या दाऊदी बोहरा समाजासाठी दफनभूमी करिता भूखंड दिला जाईल, असे आश्वासन पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिले आहे.
खारघर परिसरात दाऊदी बोहरा समाज मोठ्या संख्येने असून, निधन झालेल्या व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मृतदेह कोपरखैरणे किंवा मुंब्रा येथे घेवून जावा लागतो. त्यामुळे खारघर मधील दाऊदी बोहरा समुदायाला गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पनवेल महापालिका प्रशासनाने खारघर मधील दाऊदी बोहरा समुदायाला दफनभूमी करिता भूखंड द्यावा, यासाठी खारघर तळोजा कॉलनी वेल्फेअर असोसिएशन’चे अध्यक्ष मंगेश रानवडे, जोएब शेख यांच्यासह ‘दाऊदी बोहरा जमात ट्रस्ट’चे पदाधिकारी शेख अबीजर राजकोटवाला, मुर्तझा हार्नेसवाल, जोएब शेख, अलियासगर बनतवाला आदींच्या शिष्टमंडळाने पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांची भेट घेतली. यावेळी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिका उपायुक्त सचिन पवार यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर, सिडकोकडून पनवेल महापालिकाकडे भूखंड हस्तांतरण प्रक्रिया सुरु असून, सिडकोकडून भूखंड हस्तांतरीत झाल्यावर दाऊदी बोहरा समुदायाकरिता दफनभूमीसाठी भूखंड उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी ‘दाऊदी बोहरा जमात ट्रस्ट’च्या पदाधिकार्यांना दिले.
फोटो ः आयुक्त गणेश देशमुख यांना निवेदन देताना.