१३ वर्षीय अल्पवयिन मुलीचे अपहरण करणाऱ्या इसमाच्या तालुका पोलिसांनी आवळल्या ४८ तासात मुसक्या..
१३ वर्षीय अल्पवयिन मुलीचे अपहरण करणाऱ्या इसमाच्या तालुका पोलिसांनी आवळल्या ४८ तासात मुसक्या
पनवेल दि. ०१ (संजय कदम): एका 13 वर्षीय अल्पवयिन मुलीचे अपहरण करून तिला लपवून ठेवून गुवाहाटी आसाम येथे पळवून नेण्याच्या तयारीत असलेल्या इसमाला पनवेल तालुका पोलिसांच्या सतर्कतेमुळे गजाआड करण्यास यश आले आहे.
           तालुक्यातील हावरे बिल्डिंग, पडघे, पनवेल, येथून कोणीतरी अज्ञात इसमाने अल्पवयीन मुलगी वय 13 वर्ष हीस फूस लावून अपहरण केले असल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक संजय गळवे, पोलिस उपनिरीक्षक भरत पाटील,  पोलिस हवालदार महेश धुमाळ, पोलिस हवालदार सुनिल कुदळे, पोलीस नाईक पंकज चंदीले, पोलिस नाईक प्रकाश मेहेर, महिला पोलिस नाईक आरती लाड यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कोणताही धागादोरा नसताना कौशल्याने तपास करण्यास सुरवात केली. अपहृत मुलीचे मोबाईलचे सीडीआर प्राप्त करण्यात आले व अवलोकन केले असता एक इसम अपहृत मुलीस सतत कॉल करीत असल्याचे निर्दशनास आले. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांच्या निर्देशानुसार तात्काळ 2 पोलिस पथके नियुक्त केली.एक पथक लोकमान्य टिळक टर्मिनस, कुर्ला रेल्वे स्टेशन, मुंबई.-कल्याण रेल्वे जंक्शन,कल्याण,ठाणे- पनवेल रेल्वे स्टेशन,पनवेल येथे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्याकरिता पाठविले व दुसऱ्या पथकास मोबाइलचे  सीडीआर व गोपनीय माहितीच्या आधारे तपास करण्याकरिता सूचित केले. दरम्यान संशयित आरोपी संजीप बरदोलोई याचे सीडीआर प्राप्त झाल्यानंतर संशियत आरोपी संजिप बरदोलोई व अपहरीत मुलगी यांचे सीडीआर एकत्रित करून तांत्रिक तपास केला असता त्यामध्ये एक कॉमन कॉलर गुन्ह्याचे दिवशी दोघांचे संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.सदर इसमास प्रथम ताब्यात घेऊन अधिक तपास करता त्याने गुवाहाटी,आसाम येथे राहणारा सजीप बरदोलोई (वय-22) याने अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तीस तोंडरे, तळोजा, पनवेल येथे लपवून ठेवले आहे व उद्या ते गुवाहाटी,आसाम येथे जाणार आहेत असे सांगितले. संशयित आरोपी व अपहरित मुलीचे वापरते मोबाईलचे गुन्हयाच्या दिवशीचे लोकेशन पाहता व प्राप्त माहितीस दुजोरा मिळाल्याने आरोपीस तोंडरे गाव, तळोजा, पनवेल, जि- रायगड येथून ताब्यात घेऊन अपहरीत मुलीची महिला पोलीस अमलदारांकरवी सुरक्षित रित्या अवघ्या 48 तासांच्या आत सुटका करण्यात आल्याने तिच्या कुटूंबियांनी पनवेल तालुका पोलिसांचे आभार मानले आहेत. 
            
फोटोः अटक करण्यात आलेल्या आरोपीसह पनवेल तालुका पोलिसांचे पथक
Comments