स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकाराने खारघरमध्ये स्वच्छता मोहीम ; प्रितम म्हात्रे यांनी मानले आभार
पनवेल / प्रतिनिधी : - रविवार दि. 6 फेब्रुवारी रोजी खारघर हिरानंदानी चौक येथे रस्त्यावर सकाळी आठ वाजता खारघर मधील काही स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून स्वच्छता मोहिमेचे नियोजन करण्यात आले होते. संस्थांच्या आवाहनाला प्रतिसाद देत सुट्टीचा दिवस असून सुद्धा सकाळी आठ वाजता नागरिकांची उपस्थिती श्रमदानासाठी लक्षणीय होती.
पालिका प्रशासनावर स्वच्छतेच्या बाबतीत अवलंबून न राहता स्वयंस्फूर्तीने जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल संस्था, इश फाउंडेशन, झिरो फाउंडेशन ,युवा फाउंडेशन, सुमन साळी महिला व बाल विकास संस्था,अक्षरवेल ज्योती फाउंडेशन, लायन्स क्लब ऑफ कामोठे,पंजाबी कल्चर अँड वेल्फेअर असोसिएशन,लक्ष्यपूर्ती वेलफेअर फेडरेशन या सर्व संस्था आणि त्यांचे सदस्य तसेच खारघर मधील नागरिकांनी स्वच्छतेसाठी श्रमदान केले.
पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासून नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.अशा परिस्थितीत पालिका प्रशासनावर अवलंबून न राहता स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन हा सुरू केलेला उपक्रम खूपच कौतुकास्पद आहे असे अशा शब्दात विरोधी पक्षनेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी सर्व संस्था आणि उपस्थित नागरिकांचे कौतुक करून आभार मानले.अशा प्रकारच्या विषयात इतर संस्थांनी सुद्धा पुढाकार घेऊन असे स्वच्छता आणि आरोग्य विषयक उपक्रम घ्यावेत. जेणेकरून आपले पनवेल महानगर पालिका क्षेत्र स्वच्छ आणि आरोग्यमय होईल असे त्यांनी सांगितले.
या वेळी सदर चौकामधील शिल्प पाण्याने धुऊन स्वच्छ करण्यात आले तसेच या शिल्पाच्या आजूबाजूला सुकलेली झाडे होती ती सर्व काढल्यामुळे सदर शिल्पाने आज मोकळा श्वास घेतला.त्या शिल्पा जवळ स्वच्छता करत असताना संस्थेच्या सभासदांना त्याठिकाणी दारूच्या बाटल्या आढळल्या याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. एकीकडे आपण *दारू मुक्त खारघर* ही संकल्पना राबवीत आहोत आणि खारघरच्या प्रवेशद्वारावरच असलेल्या शिल्पा जवळ अशा गोष्टी आढळतात ही अत्यंत चिंताजनक बाब आहे ही तेथील महिलांनी चिंता व्यक्त केली. तसेच यावेळी तेथील परिसरात काही मोठी सुकलेली झाडे आहेत. त्या झाडांना स्वच्छ करून त्यांना रंग देण्यात आला आणि त्या परिसरातील झाडांवर आरोग्य आणि स्वच्छता विषयी चे संदेश नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी करण्यात येणार आहेत अशी माहिती तेथील स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळाली.