आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत ; दीर्घायुष्य लाभण्यासाठी विरुपाक्ष मंदिरात केला महामृत्युंजय जप..
आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत ; दीर्घायुष्य लाभण्यासाठी विरुपाक्ष मंदिरात केला महामृत्युंजय जप

'' वुई सपोर्ट पीएम मोदी"
पनवेल (प्रतिनिधी) देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पंजाबमध्ये प्राणांतिक संकट ओढवले होते. त्यांच्या सुरक्षेबाबत ज्या राज्यात त्यांचा दौरा होता त्या पंजाबमधील काँग्रेस सरकारने अक्षम्य दिरंगाई, बेजबाबदारपणा करून एक प्रकारे विघटनवादी शक्तींना मदत केली. त्यामुळे या घटनेचा आणि काँग्रेस सरकारचा भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली आज पनवेलमध्ये तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. त्याचबरोबर यावेळी आयोजित करण्यात आलेल्या '' वुई सपोर्ट पीएम मोदी" या  मोहिमेत कार्यकर्ते आणि नागरिकांनी 'आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत' अशी घोषणा देऊन स्वाक्षरी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी विरुपाक्ष मंदिरात महामृत्युंजय जप करण्यात आला. 
 यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना संगितले कि, देशाचे पंतप्रधान राष्ट्रीय स्मारकाचे लोकार्पण करण्यासाठी पंजाबमध्ये जातात. तो कार्यक्रम पक्षाचा किंवा राजकीय नव्हता. तो शासकीय कार्यक्रम होता. केंद्र सरकार व राज्य सरकाराच्या माध्यमातून अनेक प्रकल्पांचे त्या ठिकाणी भूमिपूजन होणार होते. अशा वेळेला पंतप्रधानांची वाट अडवली जाणे, त्याचा मार्ग ठरलेला असतो ऐन वेळेला हेलिकॉप्टर जरी रद्द झाले तर त्यावेळी ज्या ठिकाणहून मार्गक्रमण करणार त्या ठिकाणी सुरक्षेची काळजी घेतली जाते. बंदोबस्त लावला असताना निदर्शन करणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची वाट अडवली.  अशावेळी निदर्शनकर्त्यांना ताब्यात घेणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गरजेचे होते. ताब्यात घेतल्यानंतर कार्यक्रम झाल्यावर सुटका केली जाते. पण काँग्रेसचे मुख्यमंत्री यांनी जाणूनबुजून प्रोटोकॉल पाळला नाही. तसेच निदर्शन करणाऱ्यांना राज्य सरकाराच्या माध्यमातून समजावणे गरजेचे होते. पंतप्रधान २० मिनिटे असुरक्षित ठिकाणी होते, त्यावेळी परिस्थिती निवळण्यासाठी पंजाबचे मुख्यमंत्र्यांनी मात्र तसे न करता निदर्शकांना एकप्रकारे सहकार्यच केले. संविधानक पदावर असूनही मुख्यमंत्र्यानी असे बेजबाबदारपणे वागणे योग्य नाही. त्यामुळे या घटनेचा निषेध करू तेवढा कमी आहे. असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ सालापासून केलेली कामे काँग्रेसच्या डोळ्यात खुपत आहेत. जागतिक स्तरावरती मोदींचे कर्तृत्व मान्य केले जाते. त्यांच्या नेतृत्वाखाली देशात परिवर्तन, नवा भारत घडतोय आणि हे काँग्रेस पक्षाला खुपतोय, म्हणून मोदींवर आरोपांची चिखलफेक करणे,  त्यांना अपयश यावे यासाठी सर्व थरातील प्रयत्न काँग्रेस करतो हे आधी पण बघितले आहे आणि पंजाबच्या घटनेतून आणखी स्पष्ट झाले आहे. मात्र असे करत असताना देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेला धोका लागेल याची कुठलेही तमा पंजाब सरकरने बाळगली नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरले आहेत, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. 
छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शहर सरचिटणीस अमरीश मोकल, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, दिनेश खानावकर, अभिषेक भोपी, तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, शहर अध्यक्ष रोहित जगताप, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments