लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळालेल्या ज्वेलर्स चालकाचा पोलिसांकडून शोध सुरु..
लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम घेऊन पळालेल्या ज्वेलर्स चालकाचा पोलिसांकडून शोध सुरु.. 

पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः तळोजा सेक्टर-10, फेज-1 भागात हरिओम ज्वेलर्स नावाने ज्वेलर्सचे दुकान चालविणार्‍या प्रभुसिंह दसाना याने तळोजा भागातील अनेक लोकांकडून दागिने बनविण्याच्या बहाण्याने घेतलेले लाखो रुपये तसेच काही व्यक्तींनी गहाण ठेवलेले दागिने असा सुमारे 17 लाख रुपये किंमती ऐवज घेऊन, आपले दुकान बंद करुन पलायन केल्याचे उघडकिस आले आहे. त्यामुळे तळोजा पोलिसांनी या ज्वेलर्स मालकाविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  
या प्रकरणातील आरोपी प्रभु सिंह दसाना याने तळोजा सेक्टर-10 मध्ये हरीओम ज्वेलर्स ज्वेलर्स नावाने दुकान थाटले होते. त्यामुळे त्याच्या दुकानातून परिसरातील अनेक लोकांनी दागिने खरेदी केले होते. तसेच काही लोकांनी आपले दागिने गहाण ठेवले होते. तर काही लोकांनी नवीन दागिने बनवून घेण्यासाठी ज्वेलर्स मालकाकडे लाखो रुपये दिले होते. मात्र गत ऑक्टोबर महिन्यामध्ये ज्वेलर्स मालक प्रभुसिंह याने लोकांनी त्याच्याकडे गहाण ठेवलेले दागिने तसेच नवीन दागिने बनविण्यासाठी दिलेले पैसे घेऊन आपले दुकान बंद करुन पलायन केले.  प्रभुसिंह याने पुजादेवी प्रजापती तसेच सिंगारी यादव, प्रिती देसाई, फरीदा खान, हरिदास तोडकर, मोहम्मद हसन, गुडीया जैयस्वाल, भारत पाटील, शहनाज रशिद खान, रुक्सार समीर अली यांनी विश्‍वासाने गहाण ठेवलेले सोन्याचे दागिने तसेच होलमार्क करुन देण्यासाठी दिलेली रोख रक्कम असा सुमारे 17 लाख रुपये किंमतीचा ऐवज घेऊन पलायन केल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार तळोजा पोलिसांनी प्रभुसिंह विरोधात फसवणुकिसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
Comments