तहसीलदार, वन विभाग कडून खारघर मधील खाडी पट्ट्याची पाहणी
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः पनवेल वन विभाग आणि पनवेल तहसीलदार कार्यालयातील अधिकार्यांनी खारघर मधील खाडीतील खारफुटीची पाहणी केली.या पाहणीत काही ठिकाणी मासळी आणि कोळंबीसाठी खोदकाम केल्याचे आढळून आले.
रोडपाली तसेच खारघर येथील खाडी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांदळवनांचा नाश आणि जमीन घशात घालण्याचे सत्र सुरु असल्याचे निदर्शनास आले आहे. जेसीबी द्वारे भराव टावून खाडी पट्ट्यात सपाटीकरणाचे काम सुरु आहे. एकीकडे कांदळवने लवकरात लवकर वन विभागाकडे हस्तांतरित करावीत, असे आदेश नुकतेच महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांनी दिले आहेत. तर दुसरीकडे बिनदिक्कत कांदळवनांची कत्तल केली जात आहे. राज्य शासनाच्या वन विभागाने कांदळवनाचे नुकसान वाचवावे अन्यथा कांदळवनांचे कधीही भरुन न काढता येणारे नुकसान होणार आहे.
त्याचा विपरीत परिणाम खारघर, कळंबोली, कामोठे सारख्या शहरासाठी नुकसानकारक ठरण्याची शक्यता असल्याच्या तक्रारी नॅटकनेक्ट फाउंडेशन आणि श्री एकविरा आई प्रतिष्ठान तर्फे स्थानिक पर्यावरण प्रेमानी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उच्च न्यायालय नियुक्त कांदळवन समितीकडे करण्यात आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी वन सचिवांना तातडीने या प्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश सचिव वेणुगोपाल यांना दिले आहेत. सदर तक्रारीची दखल मुख्यमंत्र्यांनी घेतल्यावर पनवेल वन विभाग अधिकारी आणि पनवेल तहसीलदार विजय तळेकर यांनी खारघर सेक्टर-16 लगत असलेल्या खाडीची पाहणी केली. या पाहणीत कांदळवनाचा नाश करुन कोळंबी पैदाससाठी खोदकाम केल्याचे निदर्शनास आले.
कोट
खारघर सेक्टर-16 परिसरातील खाडी क्षेत्रातील कांदळवनात पाहणी केला असता, केलेले खोदकाम जुने असल्याचे दिसून आले. सदर खोदकाम केव्हा करण्यात आले याचा शोध वन विभाग घेणार असून, त्यानंतर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला जाणार आहे.
- विजय तळेकर, तहसीलदार - पनवेल तालुका.
फोटो ः खारघरमधील खाडी