शिवसेना पनवेल शहर शाखेचा नूतनीकरण सोहळा संपन्न..


शिवसेना पनवेल शहर शाखेचा नूतनीकरण सोहळा संपन्न

पनवेल वैभववृत्तसेवा :-  ( राज भंडारी)
रायगड जिल्ह्यातील शिवसेना गेल्या काही महिन्यांपासून अधिक जोमाने कामाला लागली आहे. पनवेलमध्ये गेल्या ५ महिन्यात जवळपास ३ हजार पेक्षा अधिक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसैनिकांचा उत्साह वाढविला. नुकत्याच नवीन पनवेल येथील जनसंपर्क कार्यालय उद्घाटन सोहळ्यानंतर आता पनवेल शहरातील सर्वात पहिल्या शाखेचा नूतनीकरण सोहळा शिवसेनेचे मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे, शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्यासह दिग्गज शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक २२ जानेवारी रोजी सायंकाळी पार पडला. यादरम्यान पनवेल शहर विभागाचे शहरप्रमुख म्हणून प्रवीण जाधव यांची खा.बारणे यांच्याहस्ते नियुक्तीपत्र देवून नियुक्ती जाहीर करण्यात आली.

यावेळी पार पडलेल्या नूतनीकरण सोहळ्याला शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, रमेश गुडेकर, शिरीष बुटाला, विधानसभा समन्वयक प्रदीप ठाकूर, तालुका संघटक भरत पाटील, पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल, विधानसभा संघटक दीपक निकम, महानगरप्रमुख रामदास शेवाळे, उप महानगरप्रमुख दीपक घरत, महानगर संघटक प्रथमेश सोमण, महानगर समन्वयक गुरुनाथ पाटील, डी. एन.मिश्रा, पनवेल शहर शाखेचे नवनियुक्त शहरप्रमुख प्रवीण जाधव, नवीन पनवेल शहरप्रमुख यतीन देशमुख, उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर भंडारी, उपशहर प्रमुख अनिल कुरघोडे, विधानसभा अधिकारी पराग मोहिते, महाराष्ट्र राज्य सोसिएल मीडिया समन्वयक तथा ग्रामीण तालुका प्रमुख केवल माळी, पनवेल शहर अधिकारी निखिल भगत, नवीन पनवेल शहर अधिकारी जितेंद्र सिद्धू, पनवेल उपशहर अधिकारी विराज साळवी, पनवेल उपशहर अधिकारी सतीश पाटील, शाखा अधिकारी प्रथम ठाकरे, उपविधानसभा अधिकारी निखिल दिघे, शाखाप्रमुख चंद्रकांत शिर्के, खांदा कॉलोनी येथील पदाधिकारी सदानंद शिर्के, दत्तात्रय महामुलकर, रामदास गोंधळी, रत्नाकर पाटील, महिला उपजिल्हा संघातिका कल्पनाताई पाटील, माजी नगराध्यक्षा शुभांगी टाकळे, रेवती सकपाळ, सुजाता कदम, प्रमिला कुरघोडे, अपूर्वा प्रभु आदी महिला उपस्थित होत्या.आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी सांगितले की, बाळासाहेबांनी पनवेलमधील पाहिलेली शिवसेना आता पुन्हा एकदा नव्या जोमाने कामाला लागली आहे. पनवेल तालुक्यातील ग्रामीण भाग आता शिवसेनेच्या माध्यमातून मजबूत होत आहे. नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कळंबोली, कामोठे आणि खारघर याठिकाणीसुद्धा शिवसेनेची घोडदौड समाधानकारक होत आहे. ज्या पद्धतीने पनवेल शहरातील शिवसेनेच्या शाखेची झालेली दुरावस्था दूर करून आज पुन्हा नव्या दिमाखात उभी केली, त्याचप्रमाणे येथील शिवसैनिकसुद्धा पुन्हा नव्याने कामाला लागलेत. आपली ताकद काय आहे हे आता येथील नागरिकांची कामे करून दाखविली पाहिजेत, यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत आपली शाखा जनतेसाठी खुली ठेवून नागरिकांची कामे करण्याची जबाबदारी आपण घेवून काम केलं पाहिजे. त्यांच्या या बोलण्यावर येथील शिवसैनिकांनी समर्थता दर्शवून जोमाने कामाला लागणार असल्याची ग्वाही दिली.

यावेळी मावळ लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीरंग ऊर्फ आप्पा बारणे यांनी सांगितले की, शिवसेना शाखा ही आपल्यासाठी एक मंदिर आहे, याठिकाणी मदत मागण्यासाठी किंवा अडचणी घेवून येणारे हे शिवसेनेवर विश्वास ठेवणारे भक्त आहेत, त्यामुळे त्यांच्या विश्वासाला सार्थ ठरणे आणि आलेल्या नागरिकांची कामे पूर्णत्वास नेणे हेच आपले प्रथम कर्तव्य आहे. येणाऱ्या काही काळात महापालिका आणि जिल्हापरिषदेच्या निवडणुका लागल्या आहेत. त्याप्रमाणे आपले अस्तित्व काय आहे हे पुन्हा एकदा या पनवेल महानगरपालिकेत दाखविण्यासाठी सज्ज व्हा. महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्कृष्ठ काम करीत आहेत, त्या पद्धतीने येथेही महाविकास आघाडीसोबत काम करीत असताना आपले तितकेच प्रभुत्व महापालिका हद्दीमध्ये निर्माण करा, आणि ज्यापद्धतीने पनवेल नगरपालिका असताना शिवसेनेच्या नगराध्यक्षा विराजमान झाल्या होत्या त्या पद्धतीने आता पनवेल महानगरपालिकेवर महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेच्या महापौर विराजमान करण्याच्या दृष्टिकोनातून काम करण्याचा मूलमंत्र यावेळी त्यांनी शिवसैनिकांना दिला.
Comments