स्व.दि.बा पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन..
स्व.दि.बा पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे अभिवादन..
दिबांच्या कार्याची महती घेवूनच आम्ही मोठे झालो - योगेश तांडेल

संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांनी दिबांच्या घरी दिली भेट

पनवेल वैभव : राज भंडारी
स्व. दिबा पाटील म्हणजे प्रकल्पग्रस्तांचे एक वादळ होते...., शासन असो किंवा प्रशासन या सर्वांना नाकात दम आणणारे नेते झाले ते म्हणजे दिबा पाटील... अशा महान नेत्याच्या जन्मदिनी त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी शिवसेनेचे पनवेल तालुका संपर्क प्रमुख योगेश तांडेल यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी एका महान नेत्यांच्या स्मृतींना उजाळा देण्याचे भाग्य आमच्या पदरात पडले असून आम्ही आजही त्यांच्या कार्याची महती घेवून मोठे झालो आहोत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण करण्याच्या दृष्टीकोनातून आम्ही शिवसैनिक लढणार असल्याचे मत योगेश तांडेल यांनी यावेळी उपस्थितांसमोर मांडले.

रायगडचे माजी खासदार, शेतकरी, कष्टकऱ्यांचे नेते आणि शेवटच्या क्षणापर्यंत आपले जीवन लढय़ात व्यतीत करणाऱ्या दि. बा. पाटील यांच्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने पनवेल तालुक्यातील विविध ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पनवेल शहरातील त्यांच्या संग्राम या निवासस्थानी अनेक दिग्गज मंडळींनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले. तसेच रयत शिक्षण संस्थेच्या शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यामार्फतही त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ठिकठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या या आदरांजली सभेतून दिबांनी केलेल्या कामाची माहिती विद्यार्थ्याकरवी देण्यात आली.

उरण तालुक्यातील जासई गावात जन्म झालेल्या दि. बा. पाटील यांनी आपले संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या मागण्याआणि हक्क मिळविण्यासाठी खर्ची घातले. लढय़ावर विश्वास असणाऱ्या दि. बा. पाटील यांनी देशातील शेतकऱ्यांना साडेबारा टक्केचा जमिनीचा मोबदला देण्यास भाग पाडले. त्याचप्रमाणे ब्रिटिशकालीन १८९४ चा भूसंपादन कायदा बदलून नवा कायदा करण्यास भाग पाडले. तीस वर्षे प्रलंबित असलेला जेएनपीटी साडेबारा टक्केचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच सिडको प्रकल्पग्रस्त, बाराबलुतेदार, आदिवासी, भूमिहीन यांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी सिडकोविरोधात आंदोलने केली. दिबांनी उरण-पनवेलमधील मागास समाजाला शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या शाळा, महाविद्यालये उभी केली, अशा अनेक गोष्टी करून खऱ्या अर्थाने कष्टकरी व गरिबांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. १९८४ च्या प्रसिद्ध उरण शेतकरी आंदोलनातील जासई येथील हुतात्मा स्मारकात अनेकांनी दिबांना आज आदरांजली वाहिली.

स्व. दिबा पाटील यांच्या नावाचा दरारा ते लोकसभेत असताना संपूर्ण भारत देशाने पहिला आहे. मात्र आताच्या तरुण पिढीसमोर त्यांनी कधीही आंदोलनाची भाषा केली नसती. कारण त्यांनी शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांच्या तरुण पिढीचे प्रतिनिधित्व करून त्यांना होणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आजकालच्या राजकीय गर्तेत सापडलेल्या दिबांची खरी ओळख ही त्याच तरुणांच्या घरापर्यंत माहिती आहे. आजही पनवेल - उरणमधील जुनी जाणती लोक दीबा म्हणजे नेमकं काय आहे हे तरुण पिढीला समजावून सांगत असतात. मात्र सध्याच्या राजकारणात तरुण पिढीला बरबाद करण्यासाठी दिबांच्या नावाचा वापर केला जात असल्याचे दुःख मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.
Comments