ओएलएक्सच्या माध्यमातून कपाट विकत घेण्याच्या बहाण्याने ८ लाख रुपये उकळणाऱ्या सायबर चोरटयांचा पोलिसांकडून शोध सुरु
ओएलएक्सच्या माध्यमातून कपाट विकत घेण्याच्या बहाण्याने ८ लाख रुपये उकळणाऱ्या सायबर चोरटयांचा पोलिसांकडून शोध सुरु

पनवेल, दि.3 (वार्ताहर) ः ओएलएक्सवर घरातील जुने कपाट विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला सायबर चोरटयांनी तब्बल 8 लाख रुपयांना गंडा घालून त्याची फसवणुक केल्याची घटना नेरुळमध्ये उघडकीस आली आहे. नेरुळ पोलिसांनी या सायबर चोरटयांविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  
या प्रकरणात फसवणुक झालेल्या व्यक्तीचे नाव आनंद राम कृष्णन (44) असे असून तो नेरुळ सेक्टर-19 भागात कुटुंबासह राहण्यास आहे. गत सफ्टेंबर महिन्यामध्ये आनंदने आपल्या घरातील जुने कपाट विकण्यासाठी ओएलएक्सवर जाहिरात टाकली होती. त्यावेळी एका सायबर चोरटयांने आर्मी मध्ये नोकरीला असल्याचे भासवून आनंदचे कपाट 7 हजार रुपयांमध्ये विकत घेण्याची तयारी दर्शविली होती. त्यावेळी आनंदने त्याला कपाट पहाण्यासाठी नेरुळ येथे येण्यास सांगितले असता, सायबर चोरटयांने आर्मीमध्ये डयुटीवर असल्याचे कारण सांगत, त्याच्या ऐवजी दुसरा व्यक्ती कपाट घेण्यासाठी येणार असल्याचे सांगितले. तसेच कपाटाची किंमत ऑनलाईन पेटीएमद्वारे पाठवित असल्याचे सांगून त्याच्या मोबाईलवर क्युआर कोड स्कॅन करण्यासाठी पाठवून दिला.  आनंदने क्युआर कोड स्कॅन केल्यानंतर त्याच्या खात्यातून दुर्गेश्‍वरी मिश्र या व्यक्तीच्या खात्यात 96 हजार रुपये वळते झाले. ही बाब आनंदने सायबर चोरटयांला सांगितल्यानंतर त्याने आनंदला टेक्नीशीयनचा नंबर देऊन त्याची रक्कम तो परत पाठवेल असे सांगितले. त्यानुसार आनंदने दुसऱया सायबर चोरटयांला संपर्क साधल्यानंतर त्याने आनंदला त्याच्या ऑनलाईन खात्यात बेनिफीशरी म्हणून त्याचे नाव टाकल्यास भाग पाडले. त्यानंतर त्याच्या खात्यातून अभिषेक पाठक, रोहीत अनुराग, अनुराग कुमार यांच्या खात्यात 1 लाख 99 हजार रुपये गेले. तसेच ज्योती सक्सेना, समीर सक्सेना या दोघांच्या खात्यावर तब्बल 5 लाख 9 हजार रुपये वळते झाले. त्यानंतर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आनंदने आपले दोन्ही खाते बंद केले. त्यानंतर त्याने नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
Comments