माहिती न देणाऱ्या परदेशी प्रवाशांवर तसेच गृहनिर्माण संस्थावर कायदेशीर कारवाई ...
पनवेल दि.8: कोरोनाच्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर गृहनिर्माण संस्थांनी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची इत्थंभूत माहिती महापालिकेकडे देण्याबाबत आदेशीत करण्यात आले आहे. अशी माहिती न देणाऱ्या परदेशी प्रवाशांवर,तसेच गहनिर्माण संस्थावर,माहिती देण्यास विलंब केल्यास अथवा माहिती लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाल्यास परदेशी प्रवासी अथवा संबधित गृहनिर्माण संस्थांवर दंडात्मक तसेच कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त गणेश देशमुख यांनी सांगितले आहे.
ओमीक्रॉन विषाणूच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी मागील 15 दिवसात आलेल्या किंवा येणाऱ्या काही दिवसात एखादा व्यक्ती परदेशातून आला असेल किंवा येणार असेल तर त्यांची माहिती गृह निर्माण संस्थांनी
८९२८९३१०४१ , ८९२८९३१०५२ या क्रमांकावर महापालिकेला कळवावी असे आवाहन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी नागरिकांना केले आहे.
अशी माहिती न देणाऱ्या परदेशी प्रवाशांवर, तसेच गृहनिर्माण संस्थानी माहिती देण्यास विलंब केल्यास अथवा माहिती लपवून ठेवल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्यावरती साथरोग अधिनियम 1897 मधील कलम 03 नियमावलीतील नियमांचे उल्लंघन केल्याचे समजण्यात येईल व ते भारतीय दंडसंहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर तसेच दंडनिय कारवाई करण्यात येणार आहे. परदेशी प्रवासी अथवा संबधित गृहनिर्माण संस्थांवर प्रभाग अधिकाऱ्यांच्यामार्फत पोलिस तक्रार दाखल करून पोलिस कारवाई व 50 हजाराइतका दंड आकारण्यात येणार आहे.
महापालिका क्षेत्रात 8 डिसेंबर सकाळ पर्यत 199 परदेशी नागरिकांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली असून यामध्ये एकही नागरिक पॉझीटिव्ह आलेला नाही. महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ट्रेसिंग टिमच्या माध्यमातून परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची शोध मोहिम सुरू आहे.परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती मिळताच या टिम त्यांना फोन करून, घरी जाऊन त्यांची आरटीपीसीआर चाचणी करत आहेत. परदेशातून आलेल्या प्रवाशांना 14 दिवस विलगीकरणात ठेवण्यात येत असून त्यासाठी तीन हॉटेल्समध्ये त्यांची व्यवस्था करण्यात आली असून अतिसंवेदनशील देशांव्यतिरीक्त इतर देशांतून आलेल्या नागरिकांना गृहविलगीकरणात राहण्याच्या सूचना महापालिकेने दिल्या आहेत.
ओमिक्रॉन विषाणूचा प्रसार होऊ नये यासाठी पालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परदेशातून आलेल्या नागरिकांनी किंवा गृह निर्माण संस्थानी अशी माहिती लपवू नये जेणे करून या विषाणूचा प्रसार होणार नाही, यासाठी नागरिकांनी दक्ष राहण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.