दोघा जणांना मारहाण केल्याप्रकरणी तीघांना अटक...
दोघा जणांना मारहाण केल्याप्रकरणी तीघांना अटक...

पनवेल, दि.20 (वार्ताहर) ः पनवेल जवळील माताजी रिटघर येथील शहापीर दर्गा या टेकडीवर फिरण्यास गेलेल्या दोघा मित्रांना तीन अनोळखी इसमांनी मारहाण केली होती. त्यांना पनवेल शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासात शोधून काढले आहे.
या ठिकाणी फिर्यादी व त्यांचा मित्र माताजी रिटघर येथील शहापीर दर्गा या टेकडीवर फिरण्यास गेले असताना तीन अनोळखी इसम तेथे आले व तुम्ही या ठिकाणी का आलात? तुम्हाला दुसरे काही काम नाही का? असे बोलून अनिल वर्मा यास दोघांनी हातचापटीने मारहाण केली व तिसरा इसम मोबाईलद्वारे शुटींग करीत होता. तसेच शिवीगाळ करीत होता. त्याचप्रमाणे फिर्यादीच्या हातास पकडून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत होता व धमकावित होता. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने व गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि गणेश दळवी, पो.हवा.वाघमारे, पो.हवा.गंथडे, पो.ना.राठोड, पो.ना.पाटील, पो.ना.साळुंके, पो.शि.मिसाळ आदींच्या पथकाने गुप्त बातमीदाराद्वारे तसेच तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपी सरफराज तय्यब साठी (26 रा.वडघर), समीर शेख (23 रा.वडघर), आफान जावेद पठाण या तिघांना अवघ्या 12 तासात शोधून काढून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Comments