पोलिसाला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाला नागरिकांनी दिला चोप ...
पोलिसाला मारहाण करणाऱ्या रिक्षा चालकाला नागरिकांनी दिला चोप ...

पनवेल, दि.1 (वार्ताहर) ः खांदेश्‍वर पोलीस ठाण्यातील एका पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करणार्‍या रिक्षा चालकाला नागरिकांनी पकडून बेदम मारहाण केल्याची घटना खांदा कॉलनीत घडली. अरुण यशवंत पवार असे या रिक्षा चालकाचे नाव असून खांदेश्‍वर पोलिसांनी त्याला सरकारी कामात अडथळा आणून पोलिसाला मारहाण करुन शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक केली आहे.  
या घटनेतील तक्रारदार पोलीस शिपाई अतुल मोहिते (32) हे खांदेश्‍वर पोलीस ठाण्यात कार्यरत असून गत रविवारी ते खांदा कॉलनीतील शिवाजी चौकात नाकाबंदीच्या कर्तव्यावर होते. नाकाबंदीवर असलेल्या पोलिसांकडून संशयास्पद वाहनांची तपासणी करण्याचे काम सुरु असताना, आरोपी अरुण पवार  हा आपल्या ताब्यातील रिक्षा घेऊन पनवेल माथेरान रोडने भरधाव वेगात शिवाजी चौकात येत होता. मात्र पुढे सुरु असलेली नाकाबंदी पाहून रिक्षा चालक अरुण पवार याने आपल्या रिक्षाला अचानक ब्रेक मारुन तो उलट्या बाजूने पनवेलच्या दिशेने पळून गेला होता. मात्र  हा प्रकार नाकाबंदीवर कर्तव्यावर असलेले पोलीस शिपाई अतुल मोहिते यांनी पाहिला होता. तसेच सदर रिक्षाची काच फुटल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते.  दरम्यान, नाकाबंदीवरील ड्युटी संपवुन मोहिते हे रात्री सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास    पोलीस ठाण्यात जात असताना, नाकाबंदीत पोलिसांना पाहुन पळून गेलेली काच फुटलेली रिक्षा व त्याचा चालक हे मोहिते यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मोहिते यांनी सदर रिक्षा चालकाला पकडून त्याच्याकडे पळुन जाण्याचे कारण विचारले असता, त्याने अरेरावीची भाषा करुन मोहिते यांना शिवीगाळ करुन त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून त्या भागात जमलेल्या नागरिकांनी पोलिसांकडे विचारपुस केली असता, सदरचा रिक्षा चालक हा नाकाबंदीत पळून गेल्याचे तसेच तो चोर असण्याची शक्यता असल्याचे सांगितल्यानंतर नागरिकांनी रिक्षा चालक अरुण पवार याला पकडून बेदम मारहाण केली.  या मारहाणीत रिक्षा चालक अरुण पवार हा जखमी झाल्यानंतर त्याठिकाणी पोलिसांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी अरुण पवार याच्यावर रुग्णालयात उपचार करुन त्याला सरकारी कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी अटक केली आहे. पोलिसांकडून अरुण पवार याची पुढील चौकशी करण्यात येत आहे.
Comments