पनवेल महापालिकेतर्फे १५ वर्षावरील मुलांना नवीन वर्षाच्या प्रारंभी लसीकरण करण्याची जय्यत तयारी सुरू
पनवेल दि. ३१ : पनवेल महापालिकेतर्फे 15 वर्षावरील मुलांना नवीन वर्षाच्या प्रारंभी लसीकरण करण्याची जय्यत तयारी करण्यात येत असून पालिका हद्दीतील शाळांमध्ये 10 पथके यासाठी तयार करण्यात आली असल्याची माहिती गुरुवारी ( दि . 30 ) महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी देऊन पालकांनी लसीकरणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र शासनाने 15 वर्षा वरील ( 15 ते 18 वयोगट ) मुलांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास परवानगी दिल्याने पनवेल महापालिका हद्दीत लस देण्यासंबंधी चर्चा करण्यासाठी महापौर कविता चौतमोल यांनी गुरुवार ( दि . 30 ) रोजी महापौर दालनात बैठक घेतली. या बैठकीला सभागृह नेते परेश ठाकूर, प्रभाग सभापती समीर ठाकूर , अनिता पाटील ,सुशीला घरत,नगरसेवक डॉक्टर अरुणकुमार भगत , रुचिता लोंढे ,नेत्रा पाटील , उपायुक्त सचिन पवार , मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉक्टर आनंद गोसावी , डॉक्टर रेहाना मुजावर उपस्थित होते.
यावेळी उपायुक्त पवार यांनी 15 ते 18 वयोगटातील म्हणजेच 2007 मध्ये जन्माला आलेल्या मुलांना कोरोना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षण विभागाच्या मदतीने 230 शाळांमध्ये जाऊन लसीकरण करण्यात येणार आहे.त्यासाठी 10 पथके तयार करण्यात आलेली असून प्रत्येक पथकात एक डॉक्टर असणार आहे. याशिवाय एक रुग्णवाहिका असणार आहे. दररोज 10 शाळा करण्यात येणार आहेत. पनवेल महापालिका हद्दीत सुमारे 40 हजार मुले आहेत. त्यांच्या पालकांनी ऑनलाइन नोंदणी करावी. शाळा बंद झाल्यास जवळच्या शाळेत लस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सांगितले.
महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांनी करोना पुन्हा वाढू लागला असल्याने महापालिकेतर्फे नवीन वर्षाच्या प्रारंभी 3 जानेवारी पासून 8 वी ते12 वीतील मुलांसाठी ( 2007 मध्ये जन्म झालेल्या ) शाळे मध्ये कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. जास्तीत जास्त पालकांनी आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी मुलांना लस देण्यासाठी शाळेला परवानगी द्यावी असे आवाहन केले .
चौकट : महापालिके तर्फे 15 वर्षावरील मुलांना कोरोंना लसीकरण 3 जानेवारी पासून करण्यात येणार आहे हा चांगला निर्णय आहे . शालेय मुलांच्या बाबतीत अनेक पालक जागरूक असतात. त्यामुळे लसीकरणाला विरोध करू शकतात यासाठी मुलांची जबाबदारी शाळांनी घेऊन लसीकरणासाठी पालकांची समती घ्यावी किवा त्यांना ऑनलाइन नोंदणी करायला सांगावे. .. परेश ठाकुर , सभागृह नेते