पत्नीची हत्या करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न...
पत्नीची हत्या करुन पतीचा आत्महत्येचा प्रयत्न...

पनवेल,  दि. ४ (वार्ताहर) ः  एका व्यक्तीने घरगुती वादातून आपल्या पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. रमेश वाघ (40) असे या पतीचे नाव असून त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर नाशिकमध्ये जाऊन स्वत: देखील किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे उघडकीस आले आहे. नेरुळ पोलिसांनी आरोपी रमेश वाघ याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.
सदर घटनेतील आरोपी रमेश वाघ नेरुळ, सेक्टर-10 मधील एनएल-1 बी इमारतीत पत्नी कविता (30) आणि दोन मुलासह राहत होता. रमेश वाघ याची मुलगी आजीकडे गावी तर मुलगा चुलत्याकडे राहण्यास होता. कविताचा पती रमेश वाघ याला दारुचे व्यसन लागल्यामुळे तो काही एक काम करत नव्हता. त्यामुळे रमेश वाघ आणि त्याच्या पत्नीमध्ये सतत घरगुती कारणावरुन वाद होत होते. त्यामुळे रमेश वाघ पत्नी कविता आणि मुलांनाही मारहाण करीत होता. याबाबतची माहिती कविता आपली बहीण आणि आई यांना नेहमी देत होती. पंधरा दिवसापूर्वी या दोघांमध्ये झालेल्या वादात रमेश वाघ याने कविताचा मोबाईल फोन फोडून टाकला होता. त्यामुळे कविताची नाशिक येथे राहणारी लहान बहीण अर्चना कविता सोबत बोलण्यासाठी रमेश वाघ याच्याच मोबाईलवर फोन करीत होती. दरम्यान रात्री देखील रमेश आणि कविता या दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात त्याने कविताची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर त्याने कविताचा मृतदेह घरामध्ये तसाच ठेवून घराला टाळे लावून नाशिक येथे पलायन केले. कविताची बहीण अर्चना हिने रमेश वाघ याच्या मोबाईलवर बहीण कविता सोबत बोलण्यासाठी फोन केल्यानंतर त्याने तिचा गळा, तोंड नाक दाबून तिला मारुन टाकल्याचे तसेच नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये हजर होण्यासाठी जात असल्याचे सांगितले. त्यामुळे अर्चनाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेतल्यानंतर त्याठिकाणी रमेश वाघ याने किटकनाशक प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रमेश वाघ याला नाशिक मधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर मृत कविताच्या नातेवाईकांनी नेरुळ येथील घरी जाऊन वुलूप उघडून पाहणी केली असता आतमध्ये कविता मृतावस्थेत आढळून आली. सदर घटनेची माहिती मिळताच नेरुळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कविताचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पोलिसांनी रमेश वाघ याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
Comments