पनवेलमध्ये ५ पैकी ३ ग्रामपंचायतमध्ये रंगणार पोट निवडणूक, २ ग्रामपंचायत बिनविरोध...
पनवेलमध्ये ५ पैकी ३ ग्रामपंचायतमध्ये रंगणार पोट निवडणूक, २ ग्रामपंचायत बिनविरोध

पनवेल, दि.12 (वार्ताहर): पनवेल मध्ये ५ ग्रामपंचायतमध्ये २१ डिसेंबर रोजी पोट निवडणूका पार पडत आहेत. यातील २ ग्रामपंचायतीच्या पोट निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. त्यामुळे २१ डिसेंबरला ३ ग्रामपंचायतमध्ये पोट निवडणूक रंगणार आहे. २२ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे. 

          पनवेलमध्ये निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत. काही महिन्यात जिल्हा परिषद, पनवेल पंचायत समिती आणि पनवेल महापालिकेच्या निवडणुका रंगणार आहेत. नुकत्याच ग्रामपंचायतच्या पोट निवडणुका जाहीर झाल्या आहेत. गव्हाण ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. तर पळस्पेमध्ये १ जागेसाठी १ अर्ज आल्याने ही जागा बिनविरोध निवडून आली आहे. त्यामुळे या ठिकाणी पोट निवडणूक होणार नाही. कसळखंड, खानाव, जांभीवलीसाठी एकूण ६ अर्ज आले. खानाव आणि जांभीवलीमध्ये १ जागेसाठी निवडणूक होत आहे. कसळखंडसाठी २ जागासाठी निवडणूक होत आहे. यापैकी प्रभाग १ मध्ये एका जागेवर निवडणूक होणार असून दुसऱ्या जागेसाठी स्थगिती देण्यात आली आहे. पूनम प्रकाश तवले (खानाव) आणि माई दत्ता गायकर (कसळखंड) यानी उमेदवारी अर्ज मागे घेतलेले आहेत. खानाव ग्रामपंचायतमध्ये अर्चना पांडुरंग दिसले आणि उषा फराड यांच्यात तर कसळखंड ग्रामपंचायतमध्ये कांता चंद्रकांत मते आणि गौरी संतोष शिंदे या दोघींमध्ये तर जांभीवली ग्रामपंचायतमध्ये मनी गोपाळ कातकरी (पवार) आणि सुप्रिया मनोहर पवार यांच्यात लढत रंगणार आहे.
Comments