वनक्षेत्र परिसरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कुठल्याही पार्ट्या केल्यास कारवाई होणार...
वनक्षेत्र परिसरात नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कुठल्याही पार्ट्या केल्यास कारवाई होणार...

पनवेल, / दि.30 (संजय कदम) ः  नवीन वर्षाच्या स्वागतासाठी अनेकजण शहराच्या बाहेर असलेल्या वनक्षेत्र परिसरात पार्ट्या करण्यासाठी येत असतात. परंतु अशा प्रकारच्या पार्ट्या करताना कोणी आढळल्यास घटनास्थळावरील साहित्य हस्तगत करून त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात येतील. तरी नागरिकांनी अशा पार्ट्या टाळाव्यात, असे आवाहन कर्नाळा वन परिक्षेत्र अधिकारी एन.डी.राठोड यांनी केले आहे.

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी त्याचप्रमाणे सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अनेक जण हे शहरी भागात न थांबता वनक्षेत्र परिसरात पार्ट्या करण्यासाठी येतात. त्या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतात. तसेच मोठमोठ्याने गाणी लावणे, डिजे लावणे, फटाके फोडणे, चुलीवर स्वयंपाक करणे, पेटत्या सिगरेटची थोटके उघड्यावर टाकणे यामुळे वनक्षेत्र परिसर असलेल्या भागातील गवताला आग लागून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. तसेच येथील असलेले वन्यजीव सुद्धा भयभीत होतात. कित्येकदा ते सैरभर होवून आक्रमक सुद्धा होत असतात. तरी नागरिकांनी वनक्षेत्र परिसरात अशा प्रकारच्या पार्ट्याचे आयोजन करू नये अन्यथा सदर ठिकाणी छापे टाकून त्या ठिकाणी असलेले साहित्य हस्तगत करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा राठोड यांनी दिला आहे.
Comments