पनवेल तालुका पोलिसांनी राबविलेल्या ऑल आऊट मोहिमेत वेगवेगळ्या अस्थापनाविरोधात कारवाई ...
पनवेल, दि.13 (संजय कदम): पनवेल तालुका पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास हद्दीत वेगवेगळ्या आस्थापाने व उद्योगधंदे, हॉटेल, लॉज आदींच्या विरोधात एकाच वेळी ऑल आऊट मोहिम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने अनैतिक धंदे करणाऱ्यांचे तसेच शासनाचे नियम न पाळता व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली 9 अधिकारी व 50 कर्मचाऱ्यांनी पनवेल तालुका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई एकाच वेळी केली. यात प्रामुख्याने कोन नाका परिसर व खारपाडा टोलनाका येथून ये-जा करणाऱ्या 132 वाहनांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे परिसरातील वेगवेगळे लॉजेस, बार, हॉटेल यांचीही तपासणी करण्यात आली. तसेच अवैद्ध दारूविक्री करणे, त्याची वाहतूक करणे, जवळ बाळगणे अशा प्रकारे तीन जणांवर कारवाई करण्यात आली आहे, तर गुटखा, तंबाखूजन्य पदार्थ जवळ विक्री करण्यास व जवळ बाळगण्यास बंदी असतानाही सदर नियम तोडणाऱ्या दोघांवर या पथकाने कारवाई केली आहे. त्याचप्रमाणे अभिलेखावरील चार आऱोपींची तपासणी करण्यात आली आहे. 14 जणांवर समन्स बजावण्यात आला आहे. त्याचप्रमाणे अवैद्धरित्या मद्यविक्री, मटका जुगार चालणाऱ्या तिघांविरूद्ध कारवाई करून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच गुन्हा करण्याच्या इराद्याने संशयितरित्या घुटमळणाऱ्या दोघांविरूद्धसुद्धा या ऑपरेशनमध्ये कारवाई करण्यात आली. पनवेल तालुका पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.