बनावट दागिने देऊन भाजी विक्रेत्याची फसवणूक, तब्बल ५ लाख रुपये उकळून फरार...
बनावट दागिने देऊन भाजी विक्रेत्याची फसवणूक, तब्बल ५ लाख रुपये उकळून फरार... 
दोघा भामट्यांचा पोलिसांकडून शोध सुरु ...

पनवेल (वार्ताहर) : जमीन खोदताना सोन्याच्या मण्यांची माळ सापडल्याचा बनाव रचुन दोघा भामट्यांनी पेण मधील एका भाजी विक्रेत्याला सोन्याचा मुलामा असलेले दागिने देऊन त्यांच्याकडून तब्बल ५ लाख रुपये उकळून पलायन केल्याची घटना उघडकिस आली आहे. या भामटÎांविरोधात पनवेल शहर पोलिसांनी फसवणुकिचा गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.  
या प्रकरणात फसवणूक झालेल्या भाजी विक्रेत्याचे नाव चंद्रकांत पवार (५४) असे असून त्यांचा पेणमध्ये भाजी विक्रीचा व्यवसाय आहे. गत २७ नोव्हेंबर रोजी ते आपल्या दुकानावर असताना, दोघे भामटे भाजी खरेदी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या दुकानावर गेले होते. त्यानंतर त्यांनी पवार यांच्याकडून मोठ्या प्रमाणात भाजी खरेदी करुन त्यांच्यासोबत ओळख वाढवून त्यांचा मोबाईल क्रमांक घेतला होता. त्यानंतर सदर भामट्यांनी पवार यांना संपर्क साधुन ते जेसीबी चालक असल्याचे व जमीनीत खोदकाम करताना त्यांना सोन्याची माळ सापडल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दोघा भामट्यांनी  पवार यांच्या भाजीच्या दुकानावर जाऊन त्यांना सोन्याची माळ दाखवून त्यातील दोन खऱया सोन्याच्या मण्यांची तपासण्यासाठी देऊन त्यांचा विश्वास संपादन केला.  
त्यानंतर गत २ डिसेंबर रोजी दोघे भामटे अंदाजे १ किलो वजनाचे सोन्याचे मणी असल्याचे भासवून सदरचे दागिने ८ ते १० लाख रुपयांमध्ये विकण्याच्या बहाण्याने पवार यांच्याकडे गेले. यावेळी पवार यांनी सदरचे दागिने ७ लाख रुपयांमध्ये विकत घेण्याची तयारी दर्शविल्यानंतर दोघा भामट्यांनी  त्यांना दागिने विकण्याची तयारी दर्शविली. यावेळी पवार यांनी प्रथम पाच लाख रुपये व उर्वरीत २ लाख रुपये नंतर देणार असल्याचे सांगितल्यानंतर दोघा भामट्यांनी  त्यांना होकार दर्शवून त्यांना त्याचदिवशी पैसे घेऊन पनवेल एसटी डेपो जवळ येण्यास सांगितले. त्यानुसार पवार यांनी त्यांच्या घरामध्ये असलेले सर्व दागिने जमा करुन सदर दागिने बँकेत गहाण ठेवून मिळालेले ५ लाख रुपये घेऊन ते आपल्या पत्नीसह रिक्षाने दुपारी २ वाजण्याच्या सुमारास पनवेल येथे गेले.  
त्यानंतर गुणे हॉस्पिटल जवळ दोघे भामटे पवार दाम्पत्याला भेटल्यानंतर त्यांनी आपल्याजवळची 5 लाख रुपयांची रक्कम त्यांना दिल्यानंतर दोघा भामट्यांनी त्यांना सोन्याचा मुलामा असलेल्या मण्यांची माळ देऊन त्याठिकाणावरुन पळ काढला. त्यानंतर पेण येथे परतलेल्या पवार दाम्पत्याने सोन्याच्या मण्याची माळ दगडावर घासुन तपासले असता, सदर मण्यांचा रंग जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पवार यांनी  दोघा भामट्यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधला असता, त्यांचे दोन्ही फोन बंद असल्याचे आढळुन आले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी  पनवेल शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
Comments