पनवेल शहर पोलिसांनी राबविलेल्या ऑल आऊट मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई..
पनवेल शहर पोलिसांनी राबविलेल्या ऑल आऊट मोहिमे अंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाई..

पनवेल, दि.12 (संजय कदम): पनवेल शहर पोलिसांनी शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास हद्दीत वेगवेगळ्या आस्थापाने व उद्योगधंदे, हॉटेल, लॉज आदींच्या विरोधात एकाच वेळी ऑल आऊट मोहिम राबवून मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याने अनैतिक धंदे करणाऱ्यांचे तसेच शासनाचे नियम न पाळता व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. 

            वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कादबाने यांनी पदभार स्विकारल्यानंतर गुन्हेगारी क्षेत्रात आळा बसविण्यासाठी वेगवेगळी पावले उचलण्यास सुरवात केली आहे. यात प्रामुख्याने त्यांनी ऑल आऊट मोहिम राबविली. यात त्यांनी अनैतिक धंदे करणाऱ्यांवर कारवाई केली. तसेच हद्दीतील सर्व लॉजेसची तपासणी करण्यात आली. एसटी स्टॅंड, रेल्वे स्टेशन परिसर, शिवाजी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उरण नाका, टपाल नाका, पंचरत्न, शिवशंभो नाका परिसर, ठाणे नाका आदी विभागांतून ये-जा करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलिस लिस्टवर असलेल्या गुन्हेगारांची शोध मोहिम सुरू करण्यात आली. रात्री उशीरा पर्यंत सुरू असणारी हॉटेल्स व इतर अस्थापने यांच्यावरही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर येणाऱ्या-जाणाऱ्या पादचारी लोकांना विभत्स चाळे व हातवारे करणाऱ्या महिलांविरूद्धसुद्धा कारवाई करण्यात आली. तसेच गुन्हा करण्याच्या उद्देशाने लपून बसलेल्या इसमाविरूद्ध सुद्धा या अंतर्गत कारवाई केली आहे. पनवेल शहर पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी नियंत्रणात येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
Comments