उरण शिक्षक पतपेढी निवडणूकीत पतंग घेणार भरारी...
उरण शिक्षक पतपेढी निवडणूकीत पतंग घेणार भरारी...

कळंबोली / (दीपक घोसाळकर) : रायगड जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात ४४ वर्षापासून कार्यरत असलेल्या व अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या उरण प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीचा धुमधडाका उडाला आहे. या निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शिक्षक पॅनल विरुद्ध महाविकास आघाडी पॅनल आमने सामने लढत देत आहेत. मात्र गेल्या पंचवार्षिक कार्य कालांमध्ये विद्यमान संचालकांनी केलेल्या दैदिप्यमान व आर्थिक उन्नतीच्या कामांवर शेकडो सभासद समाधानी  असल्याने कार्यरत संचालक पुन्हा निवडून येणार असल्याचा आत्मविश्वास विद्यमान अध्यक्ष नवनीत गावंड यांनी व्यक्त केला आहे. स्वाभिमानी पॅनलचे पतंग निशाणी असल्याने या निवडणुकीत पतंग भरघोस मतांची आघाडी घेऊन गगनभरारी घेनार असल्याचे शिक्षकांमधून बोलले जात आहे.
        रायगड जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक व खाजगी प्राथमिक शिक्षक सभासद असलेल्या उरण प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे पंचवार्षिक निवडणुक  २६ डिसेंबर रोजी होत आहे. ७५० सभासद संख्या असलेल्या पतसंस्थेमध्ये गेल्या पंचवार्षिक कार्यकालात पारदर्शक , कॅशलेस  व हायटेक पद्धतीने काम केले गेले आहे. पतसंस्थेवर असलेले तब्बल साडेतीन कोटीचे कर्ज विद्यमान संचालकांनी खर्चामध्ये काटकसर करून भरले असून पतसंस्था पूर्णपणे कर्जमुक्त केली आहे .प्रचलित दरापेक्षा कमीत कमी व्याजाने शिक्षकांना कर्ज पुरवठा करण्यात यावा यासाठी पतसंस्थेने फार मोठी कामगिरी करून शिक्षकांना व सभासदांना दिलासा दिला आहे. निवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा यथोचित सन्मान हा पतसंस्थेकडून करण्यात येत असून सभासदांच्या शिक्षक पाल्यांना शिष्यवृत्ती देणेही सुरू केले आहे. सभासदांच्या पाल्यांना शिक्षणासाठी असलेली आर्थिक भरीव मदत पतसंस्थेने गेल्या पाच वर्षात करून शिक्षकांचे मन जिंकले आहे .उरण व पनवेल मध्ये पतसंस्थेच्या स्वतःची मालकीची लाखो रुपयाची वास्तु असून सर्व कारभार हायटेक पद्धतीने केला जात असल्याने सभासदांनी याबाबत समाधान व्यक्त केले आहे. या निवडणुकीत फक्त कुरघोडी करून सभासदांचे मन विचलित करण्याचा प्रयत्न केल्या जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शिक्षक संघाने  केला असून या निवडणुकीत निश्चितच विद्यमान संचालकांनी केलेल्या संस्थेच्या आर्थिक उन्नती व विविध उपाययोजनांमुळे स्वाभिमान चे सर्व उमेदवार पतंग निशाणी सह गगनभरारी घेणार असल्याचा ठाम विश्वास स्वाभिमानीचे समन्वयक सुभाष भोपे यांनी  व्यक्त केला आहे.
Comments