तलवारीने वार करुन पळून जाणारे त्रिकुट अटकेत ....
तलवारीने वार करुन पळून जाणारे त्रिकुट अटकेत ....

पनवेल, दि.९ (वार्ताहर) ः पाळीव डुक्कर पकडून कारने पळुन जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या त्रिकुटाला हटकरणाऱया व्यक्तीवर व त्याच्या मुलावर तिघा चोरटयांनी तलवारीने वार केल्याची घटना रबाळे एमआयडीसीमध्ये घडली. राजेंद्रसिंह शिखलकरी (60), जगदीश शिखलकरी (40) व त्याचा 16 वर्षीय मुलगा अशी या त्रिकुटांची नावे असून रबाळे एमआयडीसी पोलिसांनी या तिघांना अटक केली आहे.  
या घटनेतील जखमी झालेल्यांमध्ये बाबासाहेब धांडे व तान्हाजी धांडे या दोघांचा समावेश असून ते रबाळे एमआयडीसीमध्ये रहाण्यास आहेत. बाबासाहेब धांडे यांचा रबाळे एमआयडीसी परिसरात गावठी डुक्कर पाळण्याचा व त्यांची विक्री करण्याचा पारंपारिक व्यवसाय असून त्यांच्याकडे अंदाजे 250 लहान मोठे डुक्कर आहेत. या डुकरांची देखरेख धांडे कुटुंबिय करतात. बाबासाहेब धांडे व त्यांचा मुलगा तानाजी धांडे हे त्यांच्या रिक्षाने डुक्करांची देखरेख करण्यासाठी फिरत असताना, रबाळे एमआयडीसीतील भिमनगर येथील अश्‍विनी क्वारी जवळ एका कारमधुन आलेले तिघे जण त्यांचे डुक्कर चोरुन पळुन जात असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे बाबासाहेब आणि त्यांचा मुलाने त्यांच्याजवळ जाऊन त्यांना हटकले असता, डुक्कर चोरणाऱयांनी उलट बाबासाहेब व त्यांच्या मुलाला शिवीगाळ करुन मारहाण करण्यास सुरुवात केली.  त्यानंतर त्यातील एकाने कारमधील तलवार काढून बाबासाहेब यांच्या डोक्यावर वार केले. यावेळी तान्हाजी धांडे याच्यावर देखील सदर व्यक्तीने वार केला, मात्र त्याने सदर वार वाचविल्याने तलवारीचा वार त्याच्या पायावर लागला. त्यामुळे धांडे पिता पुत्र जखमी झाले असताना, त्या भागात पोलीस गस्त घालत आले असता, धांडे पिता पुत्रांनी पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक करुन त्यांच्याजवळ असलेली तलवार व कार जफ्त केली. डुक्कर चोरण्यासाठी आलेले तिघे शिखलकारी हे एकाच कुटुंबातील असून ते वसई भागात रहाण्यास असल्याचे त्यांच्या चौकशीत आढळुन आले आहे.
Comments