बेपत्ता झालेल्या तीन तरुणींना पनवेल तालुका पोलिसांनी काढले शोधून ....
बेपत्ता झालेल्या तीन तरुणींना पनवेल तालुका पोलिसांनी काढले शोधून ....
पनवेल, दि.30 (संजय कदम) ः पनवेल तालुक्यातील वलप गाव परिसरातून तीन तरुणी ज्यामध्ये दोन अल्पवयीन व एक सज्ञान या राहत्या घरात कोणास काही एक न सांगता कुठेतरी निघून गेल्या होत्या. याबाबतची तक्रार त्यांच्या पालकांनी पनवेल तालुका पोलिसांना करताच अत्यंत शिताफीने व तांत्रिक तपासाच्या आधारे या तीनही मुलींना शोधण्यात पोलिसांना यश आले आहे.
सदर तीन मुली (02 अल्पवयीन + 01 सज्ञान ) या घरातून कोणास काहीएक न सांगता कोठेतरी निघून गेल्या आहे. याबाबतची तक्रार दाखल होताच पोलीस उपायुक्त शिवराज पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि रवींद्र दौंडकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक खेडकर यांनी केलेल्या सुचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक भोईर व महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक अंधारे यांनी तात्काळ सदर प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तांत्रिक तपास करून दोन मुलीना बदलापूर येथून व एका अल्पवयीन मुलीस ठाणे येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी करता त्या तिघी जणी आपले वेगळे आयुष्य व आई-वडिलांचे कोणतेही बंधन नसावे याकरिता परस्पर घरातून निघून गेल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांनी अविचाराने घेतलेल्या निर्णयामुळे त्यांच्याबाबतीत एखादी अप्रिय घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती अशा परिस्थितीत उपरोक्त अधिकारी व अंमलदार यांनी दाखवलेली समयसूचकता व तात्काळ केलेल्या तपासामुळे सदर तिन्ही मुलींचा यशस्वीरित्या शोध घेता आला व त्यांना त्यांच्या पालकाच्या ताब्यात सुखरूपपणे देता आले. यावेळी त्यांच्या पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले होते व सदर पालकांनी पनवेल तालुका पोलिसांचे मनापासून आभार मानले.

फोटो ः पोलिसांसह तीन मुली व त्यांचे कुटुंबिय
Comments