वृद्ध महिलेकडून ३० लाख रुपये उकळून तिची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायीकावर गुन्हा दाखल ...
वृद्ध महिलेकडून ३० लाख रुपये उकळून तिची फसवणूक करणाऱ्या बांधकाम व्यावसायीकावर गुन्हा दाखल ... 

पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः उलवे सेक्टर-19 मध्ये उभारणाऱया एका बांधकाम व्यावसायीकाने सदर इमारतीतील फ्लॅट विकत देण्याचे आश्‍वासन देऊन एका वृद्ध महिलेकडून तब्बल 30 लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन तिला गत पाच वर्षात फ्लॅट अथवा तिची रक्कम परत न करता तिची फसवणुक केल्याचे उघडकिस आले आहे. सुधीर देवीदास गव्हाळ असे या बांधकाम व्यावसायीकाचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी त्याच्या विरोधात फसवणुकिसह अपहाराचा गुन्हा दाखल करुन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे.  
या प्रकरणात फसवणुक झालेल्या वृद्ध महिलेचे नाव निता सावल (78) असे असून त्या उलवे सेक्टर-21 मध्ये भाडयाच्या खोलीत कुटुंबासह रहाण्यास आहेत. निता सावल यांना उलवे भागात स्वत:चे घर विकत घ्यायचे असल्याने 2017 मध्ये त्यांनी फ्लॅटची शोधा-शोध सुरु केली होती. त्यावेळी निता सावल यांचा जावई किरण चिटणीस याने त्याच्या ओळखीतील इंडिया लँड इफ्राचे मालक सुधीर गव्हाळ याच्या कंपनीकडून उलवे भागात नवीन इमारतीचे बांधकाम सुरु होणार असल्याचे तसेच त्याची रेरामध्ये नोंदणी झाली असल्याची माहिती दिली होती. त्यावेळी निता सावल व चिटणीस यांनी सुधीर गव्हाळ याच्या तुर्भे सेक्टर-24 येथील कार्यालयात जाऊन त्याच्या उलवे सेक्टर-19 मधील बांधकाम सुरु होणाऱया इमारतीतील 104 क्रमांकाचा फ्लॅट 30 लाख रुपयांमध्ये विकत घेण्याचे निश्‍चित केले होते.  त्यानंतर निता सावल यांनी मिरारोड येथील आपले घर विकून आलेल्या रक्कमेतील 30 लाख रुपये चेकद्वारे सुधीर गव्हाळ याला दिले होते. त्यावेळी गव्हाळ याने पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रेशन करुन देतानाच दोन वर्षात इमारतीचे बांधकाम पुर्ण करुन फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्‍वासन निता सावल यांना दिले होते. मात्र, दोन वर्षे उलटून गेल्यानंतर देखील गव्हाळ याने सदर जागेवर बांधकाम सुरु केले नाही. त्यामुळे निता सावल यांनी गव्हाळ याच्याकडे जाऊन त्यांना लवकर फ्लॅट देण्याची मागणी केली होती. त्यामुळे गव्हाळ याने इमारतीचे बांधकाम पुर्ण होईपर्यंत त्यांना दर महिन्याला  9 हजार रुपये इतके घरभाडे देण्याचे कबुल केले होते. त्यानुसार सुरुवातीचे 2 महिने त्याने निता सावल यांना घरभाडे दिले, मात्र त्यानंतर त्याने भाडे देणे बंद केले. त्यानंतर त्याने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली.  त्यामुळे निता सावल यांनी गव्हाळ याच्याकडे आपले पैसे परत मागण्यास सुरुवात केल्याने गव्हाळ याने 30 लाख रुपयांचा चेक निता सावल यांना दिला होता. मात्र सदरचा चेक बाऊन्स झाला. तेव्हांपासून आजपर्यंत सुधीर गव्हाळ याने निता सावल यांना फ्लॅटही दिला नाही, तसेच त्यांची रक्कम सुद्धा त्यांना परत केली नाही. त्यामुळे आपले पैसे मागून  थकलेल्या निता सावल यांनी अखेर एपीएमसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी बांधकाम व्यावायीक सुधीर गव्हाळ याच्या विरोधात फसवणुकिसह अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरु असून अद्याप या प्रकरणात कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Comments